शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची निवड प्रक्रिया पारदर्शी करणार : आशिष शेलार - Ashish Shelar on Shiv Chhatrapati Awards selection process | Politics Marathi News - Sarkarnama

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची निवड प्रक्रिया पारदर्शी करणार : आशिष शेलार

सरकारनामा
गुरुवार, 25 जुलै 2019

नियुक्त करण्यात आलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी  तसेच या पुरस्कारांमध्ये सर्व खेळांचा समावेश कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारांमध्ये ऑलिंपिक,कॉमनवेल्थ, एशियन गेम्स व्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत होती. या पुरस्कारांसाठी आजपर्यंत केवळ 39 क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. परंतु समाविष्ट न करण्यात आलेल्या खेळ प्रकारांचाही यामध्ये समावेश व्हावा तसेच सर्व क्रीडा प्रकारांना सर्वसमावेशक हे पुरस्कार असावेत अशी क्रीडाप्रेमींची मागणी होती.

ऑलिंपिक खेळातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी ऑलिम्पिक खेळांना प्रतिवर्षी पुरस्कार दिला जावा, गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करावी, क्रीडा संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबत सूचना, पॅरा ऑलम्पिकमध्ये असलेल्या सर्व खेळांचा शिवछत्रपती पुरस्कारामध्ये समावेश करण्यात यावा, अशा काही मागण्या क्रीडा विभागाकडे आल्या होत्या.  

क्रीडा पुरस्काराची  सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी स्पोर्ट्स पोर्टल अद्ययावत करावे अशी सूचनाही वारंवार क्रीडा प्रेमींकडून सरकारला प्राप्त झाली होती. या सर्व बाबी विचारात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री  आशिष शेलार यांनी या पुरस्काराबाबत तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. ही समिती येत्या आठ दिवसात गठीत करण्यात येणार असून, या समितीला आपला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख