लवकरच माझा मंत्री बनण्याचा योग : आशीष जयस्वाल

लवकरच माझा मंत्री बनण्याचा योग : आशीष जयस्वाल

रामटेक (जि. नागपूर) : राज्यात युतीमध्ये भाजप-शिवसेनेचा सत्तेसाठी संघर्ष सुरू असतानाच रामटेकचे नवनिर्वाचित आमदार आशीष जयस्वाल यांनी "मला येत्या सात-आठ दिवसांमध्ये तुमच्या आशीर्वादाने मंत्री बनण्याचा योग येऊ शकतो', असे भाकीत केले. आता त्यांना मंत्रिपद खुणावू लागले असल्याची चर्चा या त्यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

काचुरवाही या त्यांच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या दंगलीचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. रामटेकमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून विजयाची हॅटट्रिक नोंदवणारे जयस्वाल बंडखोरी करूनही निवडून आले. युतीच्या परंपरेत रामटेकची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली व भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला. सत्तेची चाबी शिवसेनेच्या हातात असल्यानेच त्यांना मंत्रिपदाची आशा असावी, असे बोलले जात आहे. त्यापूर्वी निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून ते शिवसेनेसोबत असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना खनिकर्म महामंडळाची जबाबदारी मिळाली होती, हे येथे विशेष.

उद्‌घाटनासाठी आलेल्या जयस्वाल यांनी त्यांच्या गावातील लोकांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, गावातील आखाड्याला, पहेलवानांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे माझे पहिले कर्तव्य आहे. माझ्या गावातील खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे, असे माझे स्वप्न आहे, मी आमदार कोणत्याही पक्षाचा नसून तुमचा आहे, असेही ते म्हणाले. काचुरवाही येथे परंपरेनुसार "भाऊबिजे'च्या दिवशी जय बजरंग व्यायाम शाळेच्यावतीने "आमदंगली'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि. प. सदस्य नरेश धोपटे, देवराव धुर्वे, शुभम कामळे, गणेश गोल्हर, गणेश कोहळे, सरपंच शैलेश राऊत, लक्ष्मण बावनकुळे, सुदाम धुर्वे, नरेश नाटकर, दृष्यंत बावनकुळे, सुनील कोल्हे, प्रकाश कावळे, नंदू नाटकर, नरेश नाटकर, मारोती मोहनकार, केशव मोरे, गंगाधर चवले, भारत देशमुख, रवी मोहनकार व गावकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com