विदर्भ रिजनल कॉंग्रेस कमिटीची स्थापना केल्यास यश निश्‍चित - डाॅ. आशीष देशमुख

राज्यात सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, केव्हाही मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी आहे. त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन दक्षिण-पश्चिममधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढलेले डॉ. आशीष देशमुख यांनी केले.
विदर्भ रिजनल कॉंग्रेस कमिटीची स्थापना केल्यास यश निश्‍चित - डाॅ. आशीष देशमुख

नागपूर ः राज्यात सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, केव्हाही मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी आहे. त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन दक्षिण-पश्चिममधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढलेले डॉ. आशीष देशमुख यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढताना, केवळ बारा दिवस मिळाले. त्याचेही सोने करीत, मुख्यमंत्र्यांची लीड कमी केली. आतापासून कामाला लागलो आहे. त्यामुळे पुढल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना निश्‍चित पराभूत करेन, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

विदर्भासाठी रिजनल कॉंग्रेस कमिटीची स्थापना केल्यास कॉंग्रेसला निश्‍चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. येथील अनसूया मंगल कार्यालयात त्यांनी विदर्भातील पराभूत उमेदवारांचा सत्कार कार्यक्रम त्यांनी काल घेतला. 

देशात 70 वर्षे सत्ता असलेल्या कॉंग्रेसकडे आजही अनेक मातब्बर नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व आणि वक्‍तृत्व आहे. मात्र, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला नाही. प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक ठिकाणी निवडून येत असलेले उमेदवार पिछाडले. राज्यातील नेतृत्वानेही आपल्याच मतदारसंघात तळ ठोकला. एकंदरीत कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक बरीच हलक्‍यात घेतल्याने अपेक्षित यश मिळाले नसल्याची भावना माजी मंत्री व कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमात माजी मंत्री रणजित देशमुख, मुकुंदराव पन्नासे, विनोद गुडधे पाटील आणि सर्वच जवळपास उमेदवार उपस्थित होते. 

प्रा. पुरके म्हणाले, निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यावर पक्षाकडूनही दुर्लक्ष केले जाते. मात्र, असा सत्कार आयोजित करून पराभूतांना नवसंजीवनी देण्याचे काम डाॅ. देशमुख यांनी केले आहे. यातून उमेदवारांनी आशावादी राहून पुन्हा जोमाने काम करावे. अनेक उमेदवारांनी बोलून दाखविलेल्या पक्षांतर्गत कारवायांवर बंधन घालण्यासाठी पक्षाकडून बंदोबस्त करणे गरजेचे आहे. आता पराभूतांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांनाच निवडून आणण्यासाठी पक्षाने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. 
कार्यकर्त्यांनीही आपल्या पक्षाने केलेल्या कामाबद्दल मतदारांना सांगावे, त्यांचा गैरसमज दूर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध कविता आणि शायरी सादर करून त्यांनी पराभूत उमेदवारांमध्ये जोश भरला.

कार्यक्रमात गडचिरोलीच्या उमेदवार डॉ. स्वाती कोडवते, वर्धेचे शेखर शेंडे, गोंदियाचे अमर वऱ्हाडे, वाशीमच्या रजनी राठोड, चिमूरचे सतीश वारजूकर, बुलडाणाच्या स्वाती वाकेकर, चंद्रपूरचे विश्‍वास झाडे, अकोटचे संजय बोडखे, रिपाइंचे (कवाडे) जयदीप कवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व पराभूत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अनंत घारड व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 
शहर, ग्रामीणच्या उमेदवारांची दांडी
डॉ. आशीष देशमुख यांच्यातर्फे आयोजित पराभूत उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि इतर जिल्ह्यांतील सर्वच उमेदवार आले होते. मात्र, शहरातील बंटी शेळके, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे तर ग्रामीणमधील सुरेश भोयर हे उमेदवार अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. याउलट रामटेकचे यादव उपस्थित होते.

गटबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा
लोकांच्या मनात अद्यापही कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसला भाजप हरवू शकत नाही, कॉंग्रेसला हरविणारे पक्षामधील काही झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी एकमुखी मागणी पराभूत उमेदवारांनी केली. पक्षाने उमेदवारी दिल्यावर अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. भाजपकडून ते पैसे घेऊन शांत बसले. त्यांच्यामुळे कॉंग्रेसला विजय मिळणाऱ्या जागा गमवाव्या लागल्या. अशा पक्षविरोधी काम करणाऱ्याचा बंदोबस्त करणारी यंत्रणा पक्षात नसल्याने प्रत्येकवेळी त्याचा फटका बसतो. पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईची एकमुखी मागणी पराभूत उमेदवारांनी केली. यावेळी त्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे प्रा. पुरके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com