हिंगण्यात डॉ.आशीष देशमुखांच्या दावेदारीने आघाडीत बिघाडी? 

Ashish Deshmukh
Ashish Deshmukh

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच माजी मंत्री रमेश बंग यांच्याविरुद्ध हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपने कुणबी कार्ड खेळून प्रथमच निवडणूक जिंकली. अटीतटीच्या लढतीत विजय घोडमारे या तुलनेत सर्वसामान्य उमेदवाराने त्यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत विद्यमान आमदाराला बदलून समीर मेघे यांना संधी दिली. भाजपला पुन्हा संधी मिळाली. आमदार समीर मेघे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर राष्ट्रवादीतून नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहीजे, अशी चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सलग दोन वेळा पराभव झाला. यामुळे या मतदारसंघावर कॉंग्रेसने दावा केला आहे. येथून डॉ. आशीष देशमुख येथून लढण्यास इच्छुक आहेत. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रीवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्‍यता आहे. 

युतीमध्ये शिवसेनेकडे असलेला हिंगणा मतदारसंघ भाजपने ओढून घेतला. शिवसेना या मतदारसंघात केवळ नावालाच उरली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला हिंगणा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक आघाडी मिळाली. याचेही श्रेय समीर मेघे यांनी घेत दावेदारी मजबूत केली. मागील पाच वर्षांत समीर मेघे यांनी त्यांच्या नम्र स्वभावाने कार्यकर्त्यांना आपलेसे केले. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता आणत त्यांनी मतदारसंघावरील पकड घट्ट केली. विजय घोडमारे व समीर मेघे यांच्या विजयाने कुणबी समाजाला लोकप्रतिनिधी मिळाल्याचे समाधान आहे. 

समीर मेघे यांना उमेदवारी दिल्यानंतर हिंगण्यातून समाजाचे दोन आमदार होतील, असा प्रचार भाजपच्या नेत्यांनी केला. ते आश्‍वासन अद्याप पूर्ण झाले नाही. याचीही सल विजय घोडमारे यांच्या मनात कायम आहे. या काळात विजय घोडमारे यांचेही समर्थक वाढले. राष्ट्रवादीकडूनही त्यांना गळ घातली जात असल्याची चर्चा अधुनमधून रंगते. दुसरीकडे भाजपमध्येही इच्छुकांची कमतरता नाही. संध्या गोतमारे यादेखील पक्षाकडे जोर लावत आहेत. पुनर्रचनेनंतर कळमेश्‍वरमधून वेगळा झाल्यानंतर हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रमेश बंग यांचा सतत दोन वेळा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 

भाजपच्या तंबूत सामील झालेले बबलू गौतम, सुरेश काळबांडे, वंदना पाल यांसारखे खंदे समर्थक रमेश बंग यांनी गमावले. तरीही कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही बंग यांच्या पाठीशी आहे. हिंगणा नगरपंचायतमध्ये झालेला सत्ताबदल व बुटीबोरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने घेतलेले आडमुठे धोरण भाजपसाठी सोयीचे ठरल्याने आता हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे संतोष नरवाडे, उज्ज्वला बोढारे यांचे नावही समोर केले जात आहे. अनुसूचित जातींची मते हिंगणा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत, हे तेवढेच खरे. 

जिल्ह्यात सहकाराची चळवळ बळकट करण्यात पूर्वीच्या कळमेश्‍वर-हिंगणा मतदारसंघाचा मोठा हातभार आहे. बॅरिस्टर. शेषराव वानखडे, बाबासाहेब केदार, रमेश बंग यांनीही हिंगणा तालुक्‍याचे प्रतिनिधित्व केले. पुनर्रचनेनंतर जिल्ह्यातील सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र असलेला मतदारसंघ म्हणून हिंगणा मतदारसंघाची ओळख आहे. 

कॉंग्रेसचा दावा 
आमदारकीचा राजीनामा देणारे रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. आशीष हेदेखील मतदारसंघाच्या शोधात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी यावेळी हिंगणा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दोन वेळा झालेल्या पराभवाचे कारण ते समोर करीत आहेत. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने हिंगण्यावर दावा केल्यास यामुळे रमेश बंग बॅकफूटवर येतील, असे मानले जात आहे. युवक कॉंग्रेसच्या कुंदा राऊत, मुजीब पठाण यांनी दावेदारी सांगितली आहे.

मिळालेली मते 
2014 
समीर मेघे (भाजप) 84 हजार 139 
रमेश बंग (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 60 हजार 981 

2009 
विजय घोडमारे (भाजप) 65 हजार 39 
रमेश बंग (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 64 हजार 339 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com