हकालपट्टी झाली तरी विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज : आशा बुचके

हकालपट्टी झाली तरी विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज : आशा बुचके

नारायणगाव : ``शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी सज्ज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मी निष्ठावान शिवसैनिक आहे. आता रणांगणातून माघार घेणार नाही. माझ्या राजकीय भवितव्याचा निर्णय शिवसैनिकच घेतील,``अशी सूचक प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून शिवसेनेच्या गटनेत्या बुचके यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईमुळे बुचके यांच्यासह तालुक्‍यातील बुचके समर्थकांना मोठा मानसिक धक्का बसला असला आहे. ही कारवाई एकतर्फी असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

या राजकीय घडामोडींमुळे आमदार शरद सोनवणे हेच शिवसेनेचे आगामी विधानसभेचे उमेदवार असल्याचे निश्‍चित झाल्याने सोनवणे समर्थकांना दिलासा मिळाला आहे. बुचके यांच्या हाकलपट्टीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून याबाबत आपल्याला काहीच माहीती नाही, अशी प्रतिक्रिया तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी व्यक्त केली.

याबाबत बुचके म्हणाल्या,``लोकसभा निवडणुकीत मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले होते.मात्र झालेल्या कारवाईमुळे मला मानसिक धक्का बसला आहे.मात्र सर्वसामान्यांचा मला पाठिंबा असल्याने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी सज्ज आहे. मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार या बाबतचा निर्णय शिवसैनिकच घेतील.``

बुचके यांच्यावरील कारवाईमुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून बुचके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार,कोणत्या पक्षात प्रवेश करणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार या बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जुन्नर येथील रुग्णालयात जाऊन बुचके यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.

मीना खोऱ्यातील व नारायणगाव परिसरातील बुचके समर्थक शिवसैनिकांकडुन या कारवाईचा निषेध केला आहे. वास्तविक आमदार सोनवणे यांच्याकडे निवडणूक प्रचाराची सूत्र होती. यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला बुचके यांनाच जबाबदार धरणे योग्य नाही.जुन्नर तालुक्‍यात आढळराव पाटील यांना अपेक्षित मतदान झाले नाही. याला आमदार सोनवणे सुद्धा जबाबदार आहेत, अशी भावना बुचके समर्थक व्यक्त करत आहेत. हकालपट्टीची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी बुचके समर्थकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com