दिल्लीकरांचा "आप' ला आवाज ! 

केंद्रात भाजप बहुमताने सत्तेवर आहे आणि त्याच राजधानी दिल्ली राज्याची सत्ता विरोधी पक्षाकडे आहे हे शल्य भाजपच्या मंडळींना सतावत होते. त्यासाठीच की काय कोणत्याही परिस्थितीत "आप'ला धूळ चारायला निघालेल्या या बलाढ्य पक्षाला यश मिळविता आले नाही. भाजप आणि कॉंग्रेसने पुन्हा सपाटून मार खाला आहे.! "आप'ला विजयश्री मिळवून देण्याचे श्रेय मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना द्यावे लागेल.
दिल्लीकरांचा "आप' ला आवाज ! 

देशभरात भाजप एक नंबरचा पक्ष. मात्र, काही राज्यात या पक्षाचे काही चालत नाही हे पुन्हा स्पष्ट झाले. त्यांच्या हातातून एक एक राज्य निसटू लागले आहे. दिल्लीत त्यांची सत्ता नव्हती हे बरोबर आहे. तरीही जंगजंग पछाडूनही सत्ता मिळाली नाही हेही खरे.

देशभरातील रथीमहारथी नेते दिल्लीच्या स्वारीवर होते. बडे बडे नेते मतदान पत्रिका वाटतानाही आपण पाहिले. तरीही भाजपचा पराभव झाला. दिल्लीकरांनी आम आदमी अरविंद केजरीवालांवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. 

गेल्या पाच वर्षापूर्वी "आप' ने असाच देशाला धक्का दिला होता. धक्का यासाठी की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी लाट आली आणि या लाटेत भलेभले प्रादेशिक पक्ष भूईसपाट झाले. मोदी "पीएम' झाल्यानंतर प्रत्येक राज्य भाजप जिंकत चालला होता.

कॉंग्रेसला तर चारीमुंड्याचित्त केले होते. लढण्याची या पक्षात ताकदच राहिली नव्हती. अशा परिस्थितीत केजरीवाल यांच्या "आप' ने मोदी लाट सर्वात प्रथम रोखली. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला केवळ तीन जागावर समाधान मानावे लागले होते. पाच वर्षापूर्वी कॉंग्रेस शुन्यावर बाद झाली होती. ती पुन्हा शुन्यावरच राहिली. 

2015 मध्ये "आप'ने 67 जागा जिंकून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. केजरीवालांच्या "आप'चे भल्याभल्यांना आकर्षण वाटत होते. उच्चविद्याविभूषित आणि नावाजलेली माणसं या पक्षात आली खरी पण, कालांतराने ती बाहेरही पडली.

खुद्द "आप' मधील काही नेत्यांनी केजरीवालांवर एकाधिकारशाहीचा आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांचाही समावेश करावा लागेल. केजरीवालांनी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरू ठेवले. आज "आप'ला 63 जागा, भाजपला सात जागा मिळाल्या आहेत. 

मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिल्लीवर लक्ष केंद्रीत केले. आपल्या लोकांना काय हवे आणि काय नको याचा अभ्यास केला आणि नेमके तेच करून दाखविले. लोकांच्या दुष्टीने ज्या अत्यावश्‍यक गोष्टी आहेत त्या त्यांनी मार्गी लावल्या. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज, पाणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. लोकांची मने त्यांनी जिंकली. त्यांनी दिल्लीकरांना जी आश्‍वासने दिली होती त्यापैकी काही गोष्टी मार्गी लावल्या हे मान्यच करावे लागेल. 

केजरीवाल दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 मध्ये प्रथम मुख्यमंत्री बनले. तीन महिने मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवालांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा निर्धार केला आणि करूनही तसेच दाखविले. पुढे 2015 मध्ये तर त्यांचा पक्ष बहुमताने सत्तेवर आला. आता तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 

केजरीवालांचं वय आज 52 आहे. ते "आयआयटी' आहेत आणि ते इन्कमटॅक्‍स कार्यालयात सह आयुक्तही होते. शासकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाजार विरोधी आंदोलन सक्रिय झाले. अण्णांच्या जवळ जातानाच आपली खास ओळखही निर्माण केली. पुढे त्यांचे अण्णांशीही मतभेद झाले. मात्र अण्णांविषयी आदर कायम ठेऊन कोणत्याही वादात ते पडले नाहीत. 

गेल्या पाच वर्षात "आप'ला गळती लागली होती. अनेक सहकारी सोडून गेले. पण, त्यांनी नवी फौजही तयार केली. नाऊमेद झाले नाही. भाजप, कॉंग्रेस सारख्या मोठ्या पक्षाशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहिले नाही.

मुळात आपला पक्ष आम आदमीचा आहे. त्यामुळे आम आदमीसाठीच काम करीत राहयचे हे लक्ष्य ठेवले. दिल्ली सरकारने शिक्षणात केलेले काम इतर राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

लोकांची नाडी ओळखण्यात केजरीवाल पटाईत आहेत. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यांने व्हाईस कॅप्टन मनीष सिसोदिया. उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना मात्र केजरीवालांनी कधी अंतर दिले नाही. त्यांना पूर्ण मोकळीक दिली. केजरीवालांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सरकार पद्धतशीरपणे चालविले.

दिल्लीकरांना आज केजरीवालानी मुख्यमंत्री म्हणून जे काही दिले आहे. त्यामध्ये सिसोदिया यांचाही सिंहाचा वाटा आहे. काही असो अरविंद केजरीवाल हे भाजपला पुरून उरले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com