दिल्लीच्या प्रचाराचे केंद्र सरकतेय शाहीन बागेकडे ! केजरीवालांना अखेर बोलणे भाग पडले...

दिल्लीच्या प्रचाराचे केंद्र सरकतेय शाहीन बागेकडे ! केजरीवालांना अखेर बोलणे भाग पडले...

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतलेले गृहमंत्री अमित शहा यांनी शाहीन बागेतील प्रदर्शनांतील कथित देशविरोधी शक्तींवर प्रचारात सारा जोर देणे सुरू करताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर देण्यास पुढे येणे भाग पडले आहे. दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, महिलांना मोफत बसप्रवास या क्षेत्रांत केजरीवाल सरकारने काय केले व हजारोंवर कोसळणारी बेरोजगारीची कुऱ्हाड, मंदीतील अर्थव्यवस्था सावरण्यात नरेंद्र मोदी सरकारला आलेले अपयश यावरून यावरून दिल्लीकरांच्या चर्चेचा व प्रचाराचा केंद्रबिंदू शाहीन बागेकडे सरकविण्याचे भाजपचे डावपेच अचूक ठरू लागल्याची चिन्हे स्पष्ट आहेत. 

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या आव्हानसमोर दिल्लीतील सत्ता, पोलिस व साधनांची मुबलकता असलेल्या भाजपचेच आव्हान आहे. लोकांच्या विकासावर कधी निवडणुका जिंकता येतात काय, या प्रश्‍नावर केजरीवाल यांनी यापूर्वी, आम्ही हेच तर बदलायला आलोय, असे आत्मविश्‍वासपूर्ण उत्तर दिले होते. मात्र 8 पेब्रुवारीच्या प्रत्यक्ष मतदानाला जेमतेम पंधरा दिवस उरले असताना केजरीवालांच्याही नकळत भाजपने आम आदमी पक्षासह त्यांनाही शाहीन बागेच्या मुद्याकडे खेचून घेण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. 

समोर अशक्‍यप्राय आव्हान दिसले की संबंधित निवडणुकीत पाकिस्तान व ध्रुवीकरणाचा रंग भरण्याचे भाजपचे डावपेच दिल्लीत दिसू लागले आहेत. मोदी-शहा जोडीच्या नेतृत्वाखालील भाजपने काहीही करून दिल्लीतील सत्तेचा 13 वर्षांचा दुष्काळ संपविण्याचा चंग बांधला आहे. संसद अधिवेशन सुरू झाले की भाजपने सत्तारूढ खासदारांनाही दिल्लीच्या प्रचाराला लावण्याचे नियोजन केले आहे. संसद म्हणजे लोकसभेतील सारेच्या सारे 303 खासदार दिल्लीत सभा घेणार आहेत व प्रत्येक खासदाराला 3-3 विधानसभा मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत. स्वतः शहा दिल्ली पिंजून काढत आहेत. शाहीन बागेतील सीसीए आंदोलनांवरून भरकटलेले कथित व्हिडीओ व शेरजील छाप बेताल तरूणांची भाषणे भाजपच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. शहा यांनी केजरीवाल यांना सवाल केला की शाहीन बागेतील देशविरोधी प्रदर्शनांना तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का, हे जाहीर करा. त्यावर केजरीवाल यांना पाणी-आरोग्यावरून आपली गाडी वळवून ""तुम्ही शेरजीलला का अटक करत नाही'' याच विषयावर आणावी लागली. 

शाहीन बागेतील निदर्शने ही सीसीएला विरोध नसून ती नरेंद्र मोदींना विरोधासाठी आहेत, असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज सांगितले. ते म्हणाले की सीसीए कायद्यामुळे एकाही भारतीयाचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही असे भाजप वारंवार सांगत असूनही त्याच्याच विरोधात "गोबेल्स' विरोधाचे वारे वहात ठेवणे यातच आंदोलनाच्या हेतूबद्दल संशय येतो. 2015 मध्येही पुरस्कार वापसीसारख्या मोहिमा दिल्ली-बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावरच सुरू जाल्या होत्या याकडे प्रसाद यांनी लक्ष वेधले. यापुढे देशाची पुन्हा फाळणी करण्याचा पुसटसा प्रयत्न जरी झाला तरी त्यांच्यावर सक्त कारवाई होईल असा कडक इशारा देऊन ते म्हणाले की संसदेने मंजूर केलेल्या कायद्यालाही विरोध करून देशाच्या लोकशाहीला विरोध करण्यात येत आहेत. 
सिसोदिया यांना आव्हान 
प्रसाद म्हणाले की या देशातील मुस्लिम पूर्ण प्रतिष्ठितपणाने देशात रहात आले आहेत. पण शाहीन बागेचा "खरा चेहरा' वेगळाच समोर आला आहे. जिन्नाचे भारतीय राजकारणात पुनरागमन झाले आहे. केजरीवाल व राहूल गांधी त्याबद्दल चूप्प आहेत व मनीष सिसोदिया, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर यांच्यासारखे त्यांचे लोक फारच बोलत आहेत. कोणत्या शाहीन बागेबरोबर सिसोदिया आहेत हे त्यांनी सांगावे असेही आव्हान प्रसाद यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com