अरुण जेटली माधवराव शिंदे यांचेही वकील होते !

विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारने जेटलींना अतिरिक्त महाभिवक्ता केले. त्यांनी बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची दिशा निश्‍चित केली, त्यासाठी कागदोपत्री तयारी केली.
arun_jaitley.
arun_jaitley.

पुणे : भाजपचे नेते अरुण  जेटली हे सर्वोच्च न्यायालयात अत्यंत नावाजलेले वकील होते . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै . माधवराव शिंदे यांचे वकील म्हणूनही काही प्रकरणात  जेटली यांनी काम पहिले होते . 

अरुण  जेटली आणि माधवराव शिंदे यांच्यात चांगलीच मैत्री होती . माधवराव शिंदे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर अरुण जेटली ज्योतीरादित्य शिंदे यांच्या सांत्वनाला आणि पुढील व्यवस्थेसाठी धावून गेले होते . 

अरुण  जेटली 1977 पासून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वकिली करत होते. जानेवारी 1990 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकिल केले. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारने जेटलींना अतिरिक्त महाभिवक्ता केले. त्यांनी बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची दिशा निश्‍चित केली, त्यासाठी कागदोपत्री तयारी केली. 

जनता दलाचे शरद यादव, कॉंग्रेसचे माधवराव शिंदे यांच्यापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी त्यांचे आशिल होते. जेटलींचे कायद्यावरील लेखन प्रसिद्ध आहे. भ्रष्टाचाराविरोधात त्यांचे कार्य आहे, त्यांनी इंडो-ब्रिटीश लिगल फोरमसमोर निबंध सादर केलेत. जून 1998 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याबाबत कामकाज सुरू होते, तेव्हा त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. 

कोका कोलाविरुद्ध पेप्सी कंपनी या देशातील विविध दाव्यांमध्ये जेटली हे 'पेप्सी'चे वकिल होते. 2002 मध्ये मनाली-रोहतांग रस्त्यावरील खडकांवर जाहिराती केल्याबद्दल "पेप्सी'ला दंड झाला, त्यावेळी जेटलींनी "पेप्सी'ची वकिली केली. 2004 मध्ये जेटलींनी राजस्थान उच्च न्यायालयात 'कोका कोला'ची वकिली केली. जेटलींनी जून 2009 पासून वकिलीचे कामकाज थांबवले. 

आर. एस. लोढा विरुद्ध बिर्ला कुटूंबिय यांच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादात जेटली बिर्लांचे वकिल होते. राम गोपाल वर्माच्या 'रन' या चित्रपटात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा वाद उपस्थित झाला तेव्हा राम गोपाल वर्माचे वकील जेटली होते. नंतर हे गाणेच चित्रपटातून वगळण्यात आले. 84 व्या आणि 91 व्या घटनादुरूस्तीत जेटली यांनी योगदान दिले आहे.   

पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या जेटलींचे शिक्षण सेंट झेवियर शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले. तेथूनच 1973 मध्ये बी. कॉम. आणि दिल्ली विद्यापिठातून 1977 मध्ये कायद्याचे पदवीधर झाले. विद्यार्थीदशेत ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवली. पदके आणि प्रशस्तीपत्रके पटकावली. 24 मे 1982 रोजी त्यांचा संगीता यांच्याशी विवाह झाला. उभयतांना रोहन व सोनाली ही मुले आहेत. 


 सत्तरच्या दशकात जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. याच संघटनेतर्फे ते दिल्ली विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख बनले. आणिबाणीच्या काळात नागरी हक्क स्थगित केले तेव्हा जेटलींना "मिसा'खाली 19 महिने तुरुंगात डांबले गेले होते .

1973 मध्ये जयप्रकाश नारायण आणि राजनारायण यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात जेटलींनी उडी घेऊन नेतृत्वही केले. जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थी आणि युवकांचे देशव्यापी संघटन बांधले त्याचे ते संयोजक होते. 

सतीश झा आणि स्मितू कोठारी यांच्या जोडीने जेटली 'पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज'चे (पीयूसीएल) बातमीपत्र प्रसिद्ध करायचे. तुरूंगातून बाहेर पडल्यावर जेटलींनी जनसंघात प्रवेश केला.

1977 मध्ये ते लोकतांत्रिक युवा मोर्चाचे समन्वयक होते. त्याकाळात कॉंग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला तोंड द्यावे. याच दरम्यान जेटली 'अभाविप'चे दिल्लीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय सचिव झाले. 1980 मध्ये त्यांना भाजपच्या दिल्ली शाखेचे सचिव आणि युवा विभागाचे अध्यक्ष करण्यात आले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com