Arun Jagtap's name suggested for Nagar South | Sarkarnama

नगर दक्षिणसाठी अरुण जगताप यांच्या नावाची सूचना

मुरलीधऱ कराळे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

लोकसभेची नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसच लढविणार आहे. ही जागा अन्य कोणासाठीही सोडणार नाही. जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे लागतील.जिल्ह्यातील नेत्यांनी कामाला लागावे,अशा सूचना  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथील आजच्या बैठकीत दिल्या असल्याचे नगर जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले . 

नगर :  लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांचे नाव जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांनी सुचविले. अरुण जगताप यांनीच लोकसभा लढवावी. त्यांचा नगर शहराबरोबरच ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. त्यामुळे ते ही जागा जिंकून आणतील, असे मत जिल्ह्यातील नेत्यांनी मुंबईत आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकित व्यक्त केले.

लोकसभेच्या निवडणुसाठी आढावा घेण्यासाठी कालपासून मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. नगर जिल्ह्याचा आढावा आज घेण्यात आला. या वेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील दक्षिणेची जागा राष्ट्रवादीची आहे. ती आपणच लढवावी, त्यासाठी आमदार अरुण जगताप यांनी उमेदवारी करून ही जागा जिंकावी, अशा सूचना नेत्यांनी केल्या. त्यावर बोलताना पवार यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. आधी महापालिका ताब्यात घ्या. उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेवू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी लोकसभेच्या दक्षिणेतील जागेसाठी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण पक्षाने कोणताही उमेदवार दिला, तरी त्यासाठी आपण सर्व ताकदिनीशी प्रयत्न करू, असेही सांगितले. बैठकित ढाकणे यांनी स्वतःहून आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे ही उमेदवारी ढाकणे किंवा जगताप यांना मिळू शकेल, असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख