Arun Gujrathi Birthday Wishes to Sharad Pawar | Sarkarnama

पवार साहेबांनी विधानसभेतील माझ्या पराभवानंतर दिवाळी साजरी करण्यास बारामतीस बोलाविले 

अरूणभाई गुजराथी (माजी विधानसभा सभापती) 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या बरोबरच्या आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी

चोपडा,(जि.जळगाव) : शरद पवार हे वेगळंच व्यक्तीमत्व आहे. ते व्यक्तीला समाजवून घेतात, त्याला जर अपयश आले तर त्याला धीरही देतात. याबाबत मला स्वत:लाच चांगला अनुभव आहे. विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी मला फोन करून धीर तर दिलाच परंतु त्यानंतर दिवाळी साजरी करण्यासाठीही बारामतीला बोलावून घेतले. 

सन 1994 मध्ये मी चोपडा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी उभा होतो. त्यात मी पराभूत झालो. निकाल लागल्यानंतर सर्वात पहिला फोन मला माझ्या या नेत्याचा आला, त्यावेळी मला धीर देत ते म्हणाले, ''अरूणभाई,मी तुमचा निकाल ऐकला तुमचा पराभव झाला, पण तुम्ही दु:ख करू नका, मला कारण माहित आहेत ज्यात तुमचा पराभव झाला. त्याला तुम्ही जबाबदार नाही, तुम्ही मतदार संघात केलेला विकास, तुमचा व तुमच्या कुंटुबियांची मतदार संघासाठी असलेला तुमचा सेवाभाव, प्रेम,आत्मियता याची मला सर्व माहिती आहे.परंतु निवडणूक आहे, यश, अपयश येत राहतात. तुम्ही वाईट वाटून घेवू नका, दिलखुलास रहा! आणि कुंटुबियांनाही सांगा."

त्यांनंतर दिवाळी होती, त्यांनी मला फोन करून सांगितलं तुमची दिपावली चोपड्याला नाही करायची आपण बारामतीला साजरी करू या. त्यांनी मला बोलावून घेतले.त्यानंतर मी दिवाळीत बारामतीला गेलो दिवाळीचे पहिले दोन दिवस मी त्यांच्या घरी माझ्यासोबत त्यांनी दिवाळीचा आनंद घेतला. फार क्‍वचित नेतृत्वात अस दिसून येतं. एक दुर्मिळ असलेले नेतृत्व, संघटन शक्ती असलेल नेतृत्व. मी त्यांचा दुसरा दाखला असा देईन की, मी विधानसभेत निवडून आलो विधीमंडळाचा पहिलाच दिवस होता. मी शरद पवारांच्या मागे बसलो होतो. गॅलरीत माझी बहिण जीजी आणि पत्नी बसल्या होत्या. त्यावेळी ते मला म्हणाले, पाहिलं का? गॅलरीत कोण बसलं आहे? त्यांनी माझी बहिण आणि पत्नी यांना फक्त एकच वेळा बघितलं होत. किती मोठी ही स्मरणशक्ती? एक सहनशक्ती, स्मरणशक्ती, सृजाणशक्ती,असलेले व्यक्तमत्व असलेलं नेतृत्व मला लाभलं, हाच त्यांच्या सोबतचा माझ्या जीवनाचा आनंददायी प्रवास. 
(शब्दाकंन-सुनील पाटील, चोपडा)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख