'सनातन' वरील लक्ष वळविण्यासाठी कथित माओवाद्यांना अटक झाल्याची वैचारिक क्षेत्रात भावना - शरद पवार

पुणे पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे ते दोषी आहेत किंवा नाहीत हे न्यायालयात ठरेल. सुदैवाने आपल्या देशात न्यायालयांवर सरकारचे नियंत्रण नाही. ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्याकडे सापडलेल्या कथित कागदपत्रांमध्ये काहीही नाही, अशी माझी माहिती आहे. जी कागदपत्रे आहेत त्या काही नोटस् आहेत.
'सनातन' वरील लक्ष वळविण्यासाठी कथित माओवाद्यांना अटक झाल्याची वैचारिक क्षेत्रात भावना - शरद पवार

नवी दिल्ली : कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश प्रकरणात कर्नाटक पोलिस खोलवर गेले आहेत. यातले संशयित एका संस्थेशी संबंधित आहेत, असे तपासातून बाहेर आले आहे. त्यामुळे त्यापासून लक्ष वळविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी काही विचारवंतांना अटक केल्याची भावना महाराष्ट्रातल्या वैचारिक गटांमध्ये असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे नाव न घेता व्यक्त केले. पुणे पोलिसांनी कथित माओवाद्यांकडून जी कागदपत्रे जप्त केली आहेत, त्यामध्ये गंभीर असे काही नाही, असेही पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 

नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी झाली. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात बोलताना ते म्हणाले, "पुणे पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे ते दोषी आहेत किंवा नाहीत हे न्यायालयात ठरेल. सुदैवाने आपल्या देशात न्यायालयांवर सरकारचे नियंत्रण नाही. ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्याकडे सापडलेल्या कथित कागदपत्रांमध्ये काहीही नाही, अशी माझी माहिती आहे. जी कागदपत्रे आहेत त्या काही नोटस् आहेत. देशाच्या पंतप्रधानांची हत्या वगैरे करण्याचा कट त्यात नाही," ज्यांना अटक केली आहे, त्यापैकी काहींना मी ओळखतो. त्यांची अतिरेकी किंवा माओवादी पार्श्वभूमी नाही, असेही प्रतिपादन पवार यांनी केले.

पवार पुढे म्हणाले, "कलबुर्गी, दाभोलकर प्रकरणात विशेषतः कर्नाटक पोलिसांनी कसून तपास केला आहे. त्यात ते खोलवर शिरले आहेत. या प्रकरणात अटक झालेल्यांचा संबंध काही संस्थांशी असल्याची कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यामुळेच या संस्थांवरचे लक्ष वळवण्यासाठी कथित माओवाद्यावरची कारवाई सुरु आहे, अशी विचारवंतांची भावना होणे स्वाभाविक आहे." पुणे पोलिसांची कारवाई चुकीची आहे, असे मी म्हणणार नाही. पण जे पकडले आहेत, त्यांची पार्श्वभूमी दहशतवादी विचारांची नाही, असेही पवार म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com