दादा, छोट्या माणसाची ही छोटी मदत आहे; दिल्लीतून जवानाचा मेसेज! - army man ajit shendge donates five thousand for cm relief fund  | Politics Marathi News - Sarkarnama

दादा, छोट्या माणसाची ही छोटी मदत आहे; दिल्लीतून जवानाचा मेसेज!

संपत मोरे
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

आमच्या पगारातून कोरोनासाठी निधी घेतला आहे मात्र तेवढी रक्कम पुरेशी वाटली नाही. महाराष्ट्रातून रोज काळजी वाटणाऱ्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. आपण काहीतरी केलं पाहिजे असे वाटलं. मला जेवढं शक्य आहे तेवढी रक्कम मी पाठवली आहे.ही रक्कम कमी आहे याची मला जाणीव आहे.

पुणे: "दादा, मी छोटा माणूस आहे. मला कोरोनाच्या संकटसमयी मदत करायची आहे. मी दिलेली रक्कम कमी आहे हे मला माहिती आहे पण आजघडीला मला जेवढं करता येईल तेवढं करत आहे," असा संदेश दिल्ली येथे सैन्य दलात सेवेत असलेल्या अजित शंकर शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. या संदेशासोबत पाच हजार रुपये पाठवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

जवान अजित शेंडगे हे मूळ तासगाव तालुक्यातील पेड गावचे आहेत. त्यांनी कोविड-19 च्या संदर्भाने उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ही मदत केली आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेक्स्ट मेसेज पाठवला असून त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अजित शेंडगे यांनी संदेशात म्हटले आहे की, "महाराष्ट्रात कोरोना रोग वाढत चालला आहे. यापरिस्थितीत उपाययोजनांसाठी 5 हजार रुपये देण्याची माझी इच्छा आहे. बाकीच्या लोकांनी खूप निधी दिला आहे. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे याची मला जाणीव आहे. पण  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझी नम्र विनंती आहे ही मदत ती फुल ना फुलाची पाकळी समजून स्विकारावी." 

अजित शेंडगे यांचे वडील शंकर शेंडगे यांनीही सैन्यदलात काम केले आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावात गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप केले होते. सामाजिक कार्याची आवड असलेले शेंडगे सध्या दिल्ली येथे ड्युटीवर आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख