Arjun Khotkar-Gorantyal Fight will be Interesting | Sarkarnama

जालना - कैलास गोरंट्याल - अर्जून खोतकर यांच्यातील सामना लक्षवेधक ठरणार

भास्कर बलखंडे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

गेल्या निवडणुकीत राज्यमंत्री खोतकर अवघ्या काही मतानी विजयी झाले होते. त्यांच्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने खोतकर यांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यानंतर खोतकर यांनी या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर अद्याप निर्णय येणे बाकी असतानाच निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत.

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असून काँग्रेस,भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जालना विधानसभा  निव़डणुकीत काँग्रेसकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल तर शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पारंपारिक सामना होईल, असे सध्या तरी चित्र आहे. भाजप शिवसेना यांच्यात निवडणुक युती न झाल्यास भाजपच्या वतीने खोतकर यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भाजपने उमेदवार दिल्यास जालना विधानसभा मतदार संघातील निवडणुकीतील सामना मोठा अभूतपूर्व  होण्याची चर्चाही रंगत आहे.

गेल्या निवडणुकीत राज्यमंत्री खोतकर अवघ्या काही मतानी विजयी झाले होते. त्यांच्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने खोतकर यांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यानंतर खोतकर यांनी या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर अद्याप निर्णय येणे बाकी असतानाच निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. त्यामुळे  दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे .भारिप बहुजन महासंघ - एमआयएम यांच्यात दोन दिवसापूर्वीच निवडणुक समझोता झाला असून जालना विधानसभामतदार संघात त्याचा काही परिणाम होईल, असे वाटत नाही. तिसऱ्या आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही.   

दोन मंत्री असतानाही विकासाची गती वाढेना
राज्य मंत्रिमंडळात परतूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे कॅबिनेट मंत्री बबनराव लोणीकर तर जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील सिमेंटचे रस्ते वगळता अन्य कोणतेही मोठी कामे या मतदार संघात झालेली नाहीत. शहरातील  भूमिगत गटार योजना, बहुचर्चित घनकचरा प्रकल्प गेल्या बारा वर्षापासून प्रलंबित आहे भाजप-शिवसेना युतीच्या गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सिडको  प्रकल्पासह अन्य मोठ्या प्रकल्पांची कामेही रखडून पडल्याने विकासाचा वेग मंदावला आहे. विकासाचा वेग वाढेल हा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. जालना शहर हे आैद्योगिक नगरी म्हणून देशाच्या नकाशावर परिचित आहे. परंतू, या क्षेत्राला पायाभुत सुविधा मिळत नसल्यामुळे  विकास रखडला आहे. शहराची स्थिती अशा प्रकारे बकाल झाल्यामुळे ही निवडणुक शिवसेनेसह भाजपला देखील सोपी नाही, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

शेतकऱ्यांमध्ये आक्रोश...
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजीचा आहे. नेमके याचेच भांडवल करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. मतदार संघात सत्ताधाऱ्यांविरूध्द विविध आंदलनाच्या माध्यमातून विरोधकांकडून मत तयार केले जात आहे. शिवसेना- भाजप हे सत्ताधारी पक्ष काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराला कसे रोखू शकतात, हा महत्वाचा मुद्या ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख