कोरोनाबाधित रुग्णामुळे छगन भुजबळांच्या निवासस्थानाचा परिसर सील!

येथील गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा 'कोरोना'चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाचाही समावेशआहे
Area Near Bhujbaj Residence Sealed
Area Near Bhujbaj Residence Sealed

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा 'कोरोना'चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाचाही समावेष आहे. अनेक हाय प्रोफाईल नागरीकांचे वास्तव्य या भागात असल्याने प्रशासन सजग झाले आहे. काल रात्रापासून हा परिसर सॅनीटाईझ करण्याचे काम सुरु झाले आहे.

सुमंगल सोसायटी, मनोहर नगर, गोविंदनगर परिसरात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुमंगल सोसायटीच्या त्रिज्यापासून तीन किलोमीटरचा परिसर पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधित केला आहे. आज सकाळी या भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले. आरोग्य विभाग तसेच महापालिककडून हा परिसर सॅनीटाईझ करण्याचे काम सुरु झाले आहे. या परिसरातील सर्व दुकाने तसेच अन्य संस्थाही बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील दुसरा व शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण येथे आढळल्याने प्रशासन सजग झाले आहे.

या परिसरातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने राज्यातील बहुतांश मंत्री आपल्या गृहजिल्ह्यात थांबून उपाययोजना व नियोजन करण्यात व्यस्त आहेत. श्री. भुजबळ देखील येथूनच प्रशासनाशी समन्वय करतात. काल ते मुंबईला गेल्याने आज येथे नाहीत. मात्र त्यांना रोज शेकडो नागरीक भेटतात. यापुढे त्यांना याविषयी जागरुक रहावे लागणार आहे.

याच भागात शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे, कल्पना चुंभळे यांचे देखील निवासस्थान आहे. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी भुजबळ फार्मवरील बंदोबस्त वाढवला असून अनावश्यक गर्दी नियंत्रीत केली आहे.

दहा दिवसांपूर्वी लासलगाव परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, सोमवारी (ता. 6) आणखी एका रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित 44 वर्षीय रुग्ण गेल्या 22 मार्चला आग्रा येथून प्रवास करून मनमाडमार्गे नाशिकमध्ये आला होता. उत्तर भारतातून आलेल्या प्रवाशांच्या यादीत नाव असल्याने पोलिसांनी त्यास गेल्या शनिवारी (ता. 4) ताब्यात घेऊन महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तपासणीसाठी पाठविल्यानंतर प्रलंबित असलेल्या 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून, आणखी 13 रिपोर्ट प्रलंबित आहेत.

पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला संबंधित रुग्ण मनोहरनगर, गोविंदनगर परिसरातील रहिवासी असून, रेल्वेचा ठेकेदार आहे. तो कामानिमित्त आग्रा येथे गेला होता. 22 मार्चला त्याने आग्रा ते मनमाड व तेथून नाशिक रोड असा रेल्वेप्रवास केल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या शनिवारीच स्वॅबचे नमुने धुळ्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते; परंतु तेथील कोरोना तपासणी किट संपल्याने तेथून सर्व नमुने परत नाशिकला व रविवारी एकूण 35 नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट सोमवारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णास आता जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com