Are Khotkar & Bapat out of race for parliament ? | Sarkarnama

खोतकर -  बापट झाले समन्वयक, आता लोकसभेला संधी मिळेल की नाही ?  

सरकारनामा
बुधवार, 13 मार्च 2019

मराठवाडयातील हिंगोली, परभणी, नांदेड , जालना, औरंगाबाद , बीड,लातूर , उस्मानाबाद येथे अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे समन्वयाचे काम बघतील.

मुंबई:  एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना भाजप आनंद मानत असताना राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भाजपतर्फे गिरीश बापट आणि शिवसेनेतर्फे अर्जुन खोतकर यांची समन्वयक पदी वर्णी लावून त्यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले  अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 

हे म्हणजे टीममधून  खेळण्यास इच्छुक असलेल्या खेळाडूला अंपायर  केल्यासारखे आहे अशी चर्चा रंगली आहे .   भाजप तर्फे गिरीश बापट यांनी पुण्यातून आणि शिवसेनेतर्फे अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून  उमेदवारी मागितलेली असून त्यांचे समर्थक मात्र समन्वयक पदाचा आणि उमेदवारीचा काही संबंध नाही असे सांगत आहेत . 

 भाजपनेते सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे नेते उदयोगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार आहेत. 

सिंधुदुर्ग, रायगड ,रत्नागिरी या तीन जिल्हयात सुभाष देसाईंना भाजपचे राज्यमंत्री रवी गायकवाड मदत करतील. तर कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी या चार लोकसभा मतदारसंघासाठी रवी चव्हाण यांनाच भाजपने जबाबदारी दिली असून शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे समन्वयाचे काम पहातील. 

पुणे आणि परिसरातील लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे गिरीश बापट तर शिवसेनेतर्फे नीलम गोरे सामनावयक म्हणून काम पाहतील . 

कोल्हापूर ,सांगली, सातारा आणि हातकणंगले येथे समन्वयाची जबाबदारी नितीन बानगुडे पाटील आणि चंद्रकांतदादा पाटील बघणार आहेत. 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक , धुळे , जळगाव , दिंडोरी , नंदुरबार या मतदारसंघांची जबाबदारी  शिवसेनेने राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर टाकली  आहे ,तेथे त्यांना भाजपतर्फे गिरीश महाजन मदत करतील.

वर्धा ,अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर,रामटेक येथे शिवसेनेने माजी मंत्री  दिपक सावंत यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे.भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे त्यांना मदत करतील. 

मराठवाडयातील हिंगोली, परभणी, नांदेड , जालना, औरंगाबाद , बीड,लातूर , उस्मानाबाद येथे अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे समन्वयाचे काम बघतील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख