‘आप’चे आता यूपीकडे लक्ष्य 

‘आप’चे आता यूपीकडे लक्ष्य 

लखनौ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केलेल्या आम आदमी पक्षाचा (आप) आत्मविश्वास सध्या वाढला आहे. दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘आप’ने आता उत्तर प्रदेशवर लक्ष्य केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीतील विकासाच्या मॉडेलचा दाखला देत ‘यूपी’त आप मते मागणार आहे, असे आज पक्षाकडून सांगण्यात आले. राज्यात पारदर्शी सरकारने देण्याचे आश्वासनही ‘आप’कडून दिले जात आहे.
 
‘आप’चे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजयसिंह यांनी दावा केला की, दिल्लीतील विकासाच्या मॉडेलसमोर भाजपचे गुजरात मॉडेल फिके पडले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोचणार असून, त्यांना ‘आप’च्या दिल्लीतील सरकारने राबविलेला विकासाचा अजेंडा आणि योजनांची माहिती देणार आहेत.
 
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशात स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर लढविण्यात येईल. दिल्लीतील विकासाच्या मॉडेलच्या आधारे आम्ही मते मागणार आहोत, अशी माहिती संजय सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दिली. 

दिल्लीत निवडून आलेले ‘आप’चे १५ आमदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. या आमदारांवर पक्षाने जबाबदारी सोपविली असून, उत्तर प्रदेशात पक्षाचा जनाधार वाढविण्याचे लक्ष्य त्यांना दिले आहे. मतदार हे द्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाच्या राजकारणाला आपलेसे करतात हे दिल्लीतील निवडणुकीत दिसून आले आहे, असेही संजय सिंह यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com