Anuradha Nagwade to contest assembly but party yet undecided | Sarkarnama

अनुराधा नागवडे  विधानसभा लढणार पण  कोणत्या पक्षाकडून ? 

संजय आ. काटे
शनिवार, 1 जून 2019

आता नागवडे काय भुमिका घेतात याकडे लक्ष आहे. विधानसभा लढणार हा त्यांचा नारा कायम असून आता अडचणीत काँग्रेसला म्हणजे पर्यायाने त्यांचा पक्षातील खरा आधार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना सोडावे लागेल. ज्या पक्षाने त्यांना नाव दिले त्यांना सोडताना राष्ट्रवादीतही अगोदरच विद्यमान आमदार या नात्याने जगताप यांनी त्यांची बाजू मजबूत करुन ठेवली आहे.

श्रीगोंदे : विधानसभा निवडणूक लढवायचीच ही भुमिका घेवून दुष्काळ दौरा व कार्यकर्त्यांची चाचपणी सुरु केलेल्या काँग्रेस नेत्या अनुराधा नागवडे यांच्या पुढे आता धर्मसंकट आहे. ज्या पक्षाने त्यांच्या घराचे राजकारण उभे केले त्याच पक्षाचा 'हात' अडचणीत आहे.

निवडणूक लढवायची झाली तर ही जागा राष्ट्रवादीला असल्याने हात नव्हे हाती घड्याळ बांधण्यासाठी त्यांना अगोदर काँग्रेस सोडावी लागेल. त्यातच आता भाजपाचे जोराचे वारे असल्याने हात, घड्याळ की अन्य काही या संभ्रमात त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. 

दिवंगत जेष्ठनेते शिवाजीराव नागवडे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात काँग्रेसची निष्ठा जपली. अपवाद 2009 मध्ये राजेंद्र नागवडे यांनी भाजपाच्या कमळावर विधानसभा लढवली होती . मात्र नागवडे यांनी संधी असतानाही काँग्रेस सोडली नाही. गेल्या विधानसभेला राहूल जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत काँग्रेसला विरोध करुन जागा जिंकण्यास मोठा हातभार लावला. अर्थात हे होत असतानाही त्यांनी काँग्रेस सोडली नाही आणि त्यांना त्याचे फळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देत राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या राज्य साखर संघाचे अध्यक्ष केले. 

राजकारणातील अपवाद सोडले तर नागवडे कुटूंब काँग्रेसनिष्ठच राहिले आहे. लोकसभा निवडणूकीत अनुराधा नागवडे यांचे नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आघाडीवर होते मात्र दक्षिणेतील विधानसभा लढणाऱ्या इच्छूकांनी त्यांच्या नावाला नापसंपती दिल्याने त्यांची उमेदवारी गेली. मात्र त्यानंतर आता विधानसभा लढण्याची भुमिका जाहीर करीत त्यांनी तयारीही सुरु केली आहे. दुष्काळ दौरा आणि कार्यकर्त्यांचे संघटन त्यांनी जोरात सुरु केले. वेळप्रसंगी घड्याळ घेवू पण विधानसभा लढू हा नाराच त्यांनी दिला. 

तथापि लोकसभा निवडणूकीचा निकाल हाती आल्यावर विरोधक कोमात गेले.  त्यांनतर आता नागवडे काय भुमिका घेतात याकडे लक्ष आहे. विधानसभा लढणार हा त्यांचा नारा कायम असून आता अडचणीत काँग्रेसला म्हणजे पर्यायाने त्यांचा पक्षातील खरा आधार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना सोडावे लागेल. ज्या पक्षाने त्यांना नाव दिले त्यांना सोडताना राष्ट्रवादीतही अगोदरच विद्यमान आमदार या नात्याने जगताप यांनी त्यांची बाजू मजबूत करुन ठेवली आहे.

त्यामुळे जर विधानसभा लढायचीच असल्यास 2009 प्रमाणे भाजपाचा पर्याय त्यांना खुला असला तरी ते तो स्विकारतील असे वाटत नाही. मात्र राजकारणात काहीही होवू शकते आणि त्याला श्रीगोंदे अपवाद नसल्याची चर्चाही जोर धरीत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख