भ्रष्टाचारी मंत्री व नेत्यांची गय नाही : अण्णा हजारे - Anna Hazare Warns Corrupt Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

भ्रष्टाचारी मंत्री व नेत्यांची गय नाही : अण्णा हजारे

- डॉ. बाळ ज. बोठे पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

विकासाला गती देण्याची समाज व देशासाठी नितांत गरज आहे. त्याबरोबरच भ्रष्टाचाराला लागलेली गळतीही थांबविली पाहिजे. या दोन्हींसाठी आपण घेतलेल्या व्रताची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीला कोणतेही मंत्री व नेत्यांनी कितीही चकरा मारल्या, तरी आपल्या भूमिकेत तसूभरही बदल होणार नाही. परिणामी, कोणत्याही मंत्र्यांच्या अथवा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले, तर त्यांची आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत गय होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. राळेगणला कोणीही व कितीही वेळा आले, तरी 'जनलोकपाल'चे दिल्लीतील आंदोलन होणारच, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

विकासाला गती देण्याची समाज व देशासाठी नितांत गरज आहे. त्याबरोबरच भ्रष्टाचाराला लागलेली गळतीही थांबविली पाहिजे. या दोन्हींसाठी आपण घेतलेल्या व्रताची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीला कोणतेही मंत्री व नेत्यांनी कितीही चकरा मारल्या, तरी आपल्या भूमिकेत तसूभरही बदल होणार नाही. परिणामी, कोणत्याही मंत्र्यांच्या अथवा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले, तर त्यांची आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत गय होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. राळेगणला कोणीही व कितीही वेळा आले, तरी 'जनलोकपाल'चे दिल्लीतील आंदोलन होणारच, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

हजारे यांनी लोकपालसह अन्य मागण्यांसाठी येत्या 23 मार्चला दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली. हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे कशा पद्धतीने 'दूरगामी' परिणाम होतील, याची जाणीव केंद्र व राज्य सरकारमधील मंडळींना झाली. त्यामुळेच सरकार आल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्र्यांना अण्णा आठवले. चौदा वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या अण्णांच्या आईचे स्मरण या मंडळींना अचानक झाले. हजारे यांच्या गावात आपल्या खात्याचे कार्यक्रम घेण्याचा सपाटा मंत्र्यांनी सुरू केला. काहींनी अण्णांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या गैरहजेरीतही राळेगणचा दौरा करण्याचा "प्रताप' केला. काहींना दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अण्णांच्या तब्येतीची 'काळजी' वाटू लागली व त्यांनी अण्णांना 'जपून' समाजकार्य करण्याचा सल्ला दिला. काहींनी 'सदिच्छा' भेट देऊन हजारे यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'गळ' घातली.

चकरा व गोडव्यांमुळे 'फेव्हर' नाही
हजारे यांनी या वृत्ताचे वाचन करीत राळेगणसिद्धी भेटीवर आलेल्या अनेकांना त्याचा दाखला दिला. ते म्हणाले, ''अनेक सरकार व पक्ष आले अन्‌ गेले; परंतु राळेगणसिद्धी परिवाराने कोणालाही बोलाविले नाही. स्वतःहून आले त्यांनाही गावात येण्यास नकार दिला नाही. कोणीही आले तरी आमच्या परिवाराने कोणाकडूनही स्वार्थ पाहिला नाही. निःस्वार्थ सेवा हीच भूमिका आजतागायत कायम ठेवली. देश व समाजहितासाठी आपण कायम संघर्ष केला आहे. त्याचे परिणामही भोगले आहेत. मात्र, तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. आपल्याबरोबरच्या मंडळींनाही अशा बाबींपासून कायम परावृत्त केले. राळेगणसिद्धी परिवाराने आतापर्यंत निःस्वार्थ सेवा हा मंत्र जोपासला आहे. त्यामुळे सरकारमधील व पक्षांमधील कोणीही आले अन्‌ कितीही वेळा आले, तरी आमच्यावर काहीच फरक पडणार नाही. भ्रष्टाचाराची गळती थांबविण्याची आमची लढाई सुरूच राहील. काही मंत्र्यांच्या फायली आपल्याकडे आल्या आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे. त्यासाठी गरज भासल्यास त्या-त्या क्षेत्रातील आमच्या विचारांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात येईल. यापूर्वीही आपल्यामुळे काही मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी मंत्री व नेत्यांची गय करणार नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीत कितीही चकरा मारल्या व आपले कितीही गोडवे गायिले तरी, काही 'फेव्हर' मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये."

कर्नाटकात दोन-अडीच लाखांच्या सभा
पंतप्रधानांनी आपल्या 36 पत्रांना उत्तर दिले नाही. त्यामुळे आपल्याला जनलोकपालसंदर्भात देशभर हाक द्यावी लागली. त्यासाठी राज्यांचा दौरा सुरू केला आहे. कर्नाटकामधील नुकत्याच झालेल्या दौऱ्यात बेळगाव, हुबळी या सीमावर्ती भागात भाषेचा मोठा वाद आहे. त्यामुळे सभा कशा होणार, त्याला किती गर्दी होणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये साशंकता होती. कर्नाटक-महाराष्ट्र प्रश्‍नावर सर्व जण कधीच एकत्र येत नसल्याची उदाहरणे आहेत; परंतु आपल्या जनलोकपालच्या प्रबोधनसभांसाठी मात्र सर्व संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते-नेते एकत्र आले. त्यामुळेच त्या भागातील सभांना दोन-अडीच लाख आबालवृद्धांची हजेरी होती. यावरून जनलोकपालसह शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर जनता किती आग्रही आहे, हे दिसून येते, असे हजारे यांनी स्पष्ट केले.

आता दक्षिणेकडील राज्यांचा दौरा
हजारे म्हणाले, की देशव्यापी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, अरुणाचल, राजस्थान या राज्यांमधील सभांनी गर्दीचा उच्चांक मोडला. त्यामध्ये बुंदेलशहर, बुंदेलखंड, खजुराहो येथील सभांचा विशेष उल्लेख करावा लागेल. पूर्वेकडील राज्यांमधील पहाडी भागातील सभांसाठीची शिगेला पोचलेली उत्सुकता पाहायला मिळाली. तेथील जनतेने लोकपालसह इतर प्रश्‍न आमच्या जिव्हाळ्याचे असल्याचे सांगितले. आता दुसऱ्या टप्प्यात जानेवारीतील शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दक्षिणेकडील केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील उर्वरित भागांत सभा होणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हरियाना व पंजाबमध्ये सभा होणार आहेत. निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या हरियाना व गुजरातमधील सभा दिल्लीतील आंदोलनाच्या अगोदर होतील, असे हजारे यांनी सांगितले.

व्यासपीठावर राजकारण्यांना थारा नाही!
देशभरात झालेल्या सर्व सभांचे नियोजन जनआंदोलनाचे स्थानिक कार्यकर्ते करतात. या सभांमध्ये आम्ही कोणत्याही पक्ष व पार्टीला विरोध करीत नाही. फक्त लोकपाल, लोकायुक्त व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात येऊन प्रबोधन केले जाते. व्यासपीठावर कोण बसणार, हे आमचे स्थानिक कार्यकर्तेच ठरवितात. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत राजकारण्यांना व्यासपीठावर व सभेच्या नियोजनात थारा दिला जात नाही. विशेष म्हणजे राजकारणी मंडळी सभेत आपल्यासमोरही बसत नाहीत. मागे लांब कुठे तरी बसून सभा ऐकत असतील, तर माहिती नाही. आपल्या कोणत्याही सभेसाठी हाच 'फॉर्म्युला' असतो व यापुढेही राहील, असे अण्णांनी निक्षून सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख