anna hajares security minimized after his request | Sarkarnama

आणि VIP सुरक्षा विभागाने अण्णा हजारेंचे संरक्षण कमी केले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रोज पहाटे पाच वाजता उठतात. त्यानंतर दररोज योगासने, प्राणायाम, चालणे असे व्यायाम करतात. साडेनऊ वाजता नाष्टा करतात.

राळेगणसिद्धी (नगर): कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी संचारबंदी काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने आपली सुरक्षा कमी करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. 

नाशिक येथील व्ही.आय.पी. सुरक्षा विभागाने हजारे यांच्या मागणीनुसार त्यांच्या यंत्रणेतील काही कर्मचारी कमी केल्याचे आज पाहायला मिळाले. सध्या नाशिक येथील एक अधिकारी व दोन कर्मचारी हजारे यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. नगरचे पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनाही हजारे यांनी याबाबत लेखी पत्र पाठविले आहे. 

पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, की जागतिक कोरोना महामारीचे देशावर आलेले संकट हे अतिशय गंभीर आहे. केंद्र व राज्य सरकारने प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने या काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. मी माझे सर्व दौरे रद्द केले असून, या काळात राळेगणसिध्दी येथील निवासस्थानी राहणार आहे. त्यामुळे माझी पोलिस सुरक्षा व्यवस्था कमी करून ती सर्व यंत्रणा कोरोना संकट दूर करण्यासाठी उपयोगात आणावी, अशी विनंती हजारे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. सध्या हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. हजारे यांनी याआधीही अनेकदा राज्य शासनाला आपली सुरक्षा कमी करण्याची विनंती केली होती. परंतु सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली नव्हती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रोज पहाटे पाच वाजता उठतात. त्यानंतर दररोज योगासने, प्राणायाम, चालणे असे व्यायाम करतात. साडेनऊ वाजता नाष्टा करतात. त्यानंतर नियमित वाचन व लेखन करतात. सध्या वर्तमानपत्रे प्रकाशित होत नसल्याने कोरोनाच्या दैनंदिन बातम्या टीव्हीवर पाहुन परिस्थितीवर लक्ष ठेवतात. त्यांचा सध्या मुक्काम राळेगणसिध्दी येथील ट्रेनिंग सेंटरमधील त्यांच्या खोलीत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख