अनिल गोटेंची भाजपच्या 'जानी दुश्‍मन' नेत्यांविरुद्ध तक्रार; राजकारणात पोलिसांचे 'सॅंडविच'

डाॅ. सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे आदीनेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे उल्लंघन केले, सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, काहींनी मास्क लावले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीसह तक्रार माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी शहर पोलिस ठाण्याला दिली आहे
Anil Gote Complaints aginst Subhash Bhamre
Anil Gote Complaints aginst Subhash Bhamre

धुळे : भाजपच्या महानगर शाखेतर्फे सेवाभावातून येथील अग्रवाल विश्राम भवनात रोज सकाळी व सायंकाळी मिळून वीस हजार गरिबांसाठी 'फूड पॅकेट' बनविले जात आहेत. त्यात माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी 'फूड पॅकेट' भरतानाची छायाचित्रकारांना पोझ दिली.

त्यावेळी या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे उल्लंघन केले, सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, काहींनी मास्क लावले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीसह तक्रार माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी शहर पोलिस ठाण्याला दिली आहे.  यानंतर असे कुणाकुणावर किती गुन्हे दाखल करणार, सेवाभाव जोपासायचा की नाही, असा प्रश्‍न भाजपच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. शहरातील अशा भरकटणाऱ्या राजकारणात मात्र पोलिसांचे 'सॅण्डवीच' होत आहे.

धुळ्यातच नाही तर खुद्द 'कोरोना'बाधित मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे चित्र वृत्त वाहिन्यांकडूनही दाखविले जात आहे. तसेच गरिबांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर सरसावल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. तुलनेत काही किरकोळ अपवादवगळता धुळेकरांनी "लॉक डाउन', संचारबंदीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन खुद्द पंतप्रधान, मुख्यमंत्रीही वारंवार करीत आहेत.

धुळे शहरात गरिबांसह बंदोबस्तासाठी तैनात पोलिस, नर्सेस, पत्रकार यांसह विविध गरजू घटकांना मदतीसाठी अनेक संघटना, व्यक्ती सरसावल्या आहेत. जेवण, अन्नधान्य, फूड पॅकेट, पाणी, चहा, सरबत, मास्क, सॅनिटायझर वाटप, रक्तदान आदी उपक्रमांना वेग आला आहे. शासनाने शिवभोजन केंद्रही सुरू केले असून, तेथे राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्‌घाटन होत आहे. शहरासह जिल्ह्यात असे उपक्रम सुरू आहेत. यात बहुतांश ठिकाणी संचारबंदीसह सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येते.

सेवाभावासाठी शहरात जिल्हा प्रशासनाकडून विविध संस्था, व्यक्तींना आतापर्यंत 260 पासेस वाटप झाले आहेत. असे असताना श्री. गोटे यांनी राजकीय दुश्‍मन असलेल्या भाजपच्या नेत्यांना टार्गेट केले आहे. संसर्गजन्य 'कोरोना व्हायरस'चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 'लॉक डाऊन', संचारबंदी, 'सोशल डिस्टन्सिंग'सह गर्दी टाळणे, मास्क लावणे आदी विविध प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यातील नियम भाजप नेते, पदाधिकाऱ्यांकडून पाळले जात नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शहर पोलिस ठाण्याला देत श्री. गोटे यांनी काही छायाचित्र, व्हीडीओ क्‍लिप पुराव्यादाखल दिल्या आहेत.

ही माहिती मिळताच सेवाभाव जोपासाचा की नाही, गरिबांना फूड पॅकेट देण्याचा आमचा उद्देश, हेतू वाईट आहे का, ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही मग कुणाकुणावर गुन्हा दाखल करणार, असा प्रश्‍न भाजपच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com