राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याचा  प्रश्नच नाही : माजी मंत्री अनिल देशमुख

मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याचा  प्रश्नच नाही : माजी मंत्री अनिल देशमुख

नागपूर : मी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवसात सुरू आहेत.  या आशयाचे वृत्त ही अलीकडे प्रकाशित  झाले. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 'सरकारनामा' बोलताना दिली. 

माझा पक्ष राष्ट्रवादी होता, आहे आणि राहील. शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यांच्या कुशल आणि परिपक्व नेतृत्वात आम्ही घडलो, याचा सार्थ अभिमान आहे. शरद पवार साहेबांना सोडून जाण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी महीनाभरापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा  होती . तेव्हा सलील यांना विचारणा केली असता, त्यांनी या भेटीचा साफ इन्कार केला होता. पण तेंव्हापासून अनिल देशमुख वेगळा विचार करीत असल्याची चर्चा  होती .  पण आता  देशमुख यांनी  स्पष्ट इन्कार केल्याने या  विषयावर पडदा पडला आहे . 
काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख 1995 ते 2009 पर्यंत चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून जेव्हा जेव्हा भाजप-शिवसेना युती झाली तेव्हा तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. पण आजतागायत सेनेला येथे विजय मिळविता आला नाही. शिवसेनेने येथे सतीश शिंदे, किरण पांडव, राजू हरणे यांना उमेदवारी देऊन प्रयत्न करुन पाहीला. पण तिन्ही वेळा त्यांचा हा प्रयत्न फसला. 

2014 मध्ये पुतणे डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपच्या तिकीटावर लढून अनिल देशमुखांची विजयी घोडदौड रोखली. भाजपनेही इतिहासात पहील्यांदाच काटोलात डॉ. आशीष यांच्या रुपाने विजय पाहीला. 1995 मध्ये अनिल देशमुख येथून अपक्ष निवडून आले. तेव्हा भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये ते क्रीडा मंत्री होते. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर सलग तिन वेळा निवडून आले. नागपूर जिल्ह्यात सतत चार वेळा निवडून येण्याचा विक्रम केवळ त्यांच्याच नावावर आहे. 

काटोल विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात 2014 मध्ये भाजपने पहील्यांदा विजय मिळवला. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com