Anil Babar's cabinet has gone because | Sarkarnama

शिवसैनिकांच्या विरोधामुळेच अनिल बाबरांचे मंत्रीपद गेले!

अजित झळके
सोमवार, 30 डिसेंबर 2019

बाबर शिवसेनेचे असले तरी त्यांचे भाजपशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर त्यांच्यावर मोठी मेहरनजर राहिली. त्यामुळे भाजप-शिवसेनेची सत्ता आली असती तर पश्‍चिम महाराष्ट्रात सांगलीला प्राधान्याने शिवसेनेला पद द्यावे लागले असते. बाबर मंत्री झाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते आता कुजबूज करू लागले आहेत.  

सांगली : खानापूर मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार झालेल्या अनिल बाबर यांना मंत्रीमंडळात शंभर टक्के संधी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. ती आता फोल ठरली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असती तर अनिलभाऊ आज मंत्री असते, अशी कुजबुज त्यांच्या गोटात सुरु झाली आहे. 

2014 साली राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनिल बाबर यांनी सांगलीच्या गडात पहिल्यांदा शिवसेनेचे खाते खोलले. ते जिल्ह्यातील पहिले शिवसेनेचे आमदार झाले. शिवसेनेलाही अपेक्षा नसताना हे घडले. त्यावेळी भाजप, शिवसेना स्वतंत्र लढली होती आणि बाबर यांनी शिवसेनेत जावून चूक केली, असा सूर उमटला होता. अनिलभाऊंनी शिवसेनेत जावे, हा निर्णय त्यांचे पुत्र सुहास बाबर यांनी घेतला होता. त्यामुळे सुहास यांच्यावर त्यावेळी प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली होती, पण बाबर यांनी वादळात दिवा लावला. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी आस्मान दाखवत ते आमदार झाले. 

राज्यात भाजप-शिवसेनेत पाच वर्षे ताणतणावाचीच राहिली. या काळात सेनेने भाजपचा पाठींबा काढू नये, यासाठी उघडपणे भूमिका घेणाऱ्यांमध्येही बाबर एक होते. 2019 ला त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेकडून बाजी मारली आणि ते मंत्री होणार, असेच चित्र निर्माण झाले. भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर बाबर यांची शपथ निश्‍चित, असेच मानले गेले. कारण, बाबर शिवसेनेचे असले तरी त्यांचे भाजपशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर त्यांच्यावर मोठी मेहरनजर राहिली. त्यामुळे भाजप-शिवसेनेची सत्ता आली असती तर पश्‍चिम महाराष्ट्रात सांगलीला प्राधान्याने शिवसेनेला पद द्यावे लागले असते. बाबर मंत्री झाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते आता कुजबूज करू लागले आहेत.  

अनिल बाबर यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी काहीही केले नाही, त्यामुळे त्यांना मंत्री का करावे, असा सवाल शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता, अशीही माहिती समोर येत आहे. 'मातोश्री'वर कान फुंकले गेल्याने बाबर यांचा विचार झाला नाही का, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. बाबर यांनी आपला मतदार संघ सांभाळला, हे वास्तव आहे, मात्र त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा उपाध्यक्ष होता आणि खानापूर पंचायत समिती सेनेच्या ताब्यात होती, हे विसरलात का? असाही सवाल बाबरप्रेमींकडून आता केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख