Anewadi in Satara distric in shock over hanging penalty verdict of Kulbhushan Jadhav | Sarkarnama

कुलभूषण यादव यांना शिक्षा सुनावल्यावर आनेवाडी सुन्न

प्रशांत गुजर
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कुलभूषण जाधव गेल्या सहा वर्षांपासून आनेवाडीत वास्तव्यास आहेत. हेरगिरीसारख्या गोष्टी त्यांच्याकडून नक्कीच होणार नाही. त्यांना भारत सरकारने सोडवून त्यांच्यासारख्या देशप्रेमी कमांडरवर अन्याय होऊ देऊ नये.
- सदाशिव टिळेकर (आनेवाडी, माजी सभापती, जावळी तालुका)

सातारा - सायगाव आनेवाडी (ता. जावळी) येथे अधूनमधून वास्तव्य असणारे व मुंबईत राहणारे नौदल सेवामधील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्याने आरोप करून फाशीची शिक्षा सुनावली असल्याचे समजताच आनेवाडी येथील गावकरी सुन्न झाले. आनेवाडी येथील वास्तव्यात जाधव सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असल्याने ते परिसरात परिचित होते.

जाधव यांचे मूळ गाव भुईंज (ता. वाई) आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जाधव यांचे वास्तव्य असे. त्यांनी पुणे बंगळूर महामार्गावरील आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीशेजारी शेती खरेदी करून शेतात फार्म हाऊस बांधून आपल्या निवृत्त पोलिस असणारे वडील व आई यांच्यासह कुटुंबीयांसमवेत वर्षातून तीन-चार वेळा सुटीसाठी येत असत.

आल्यानंतर मात्र जाधव स्वस्थ न बसता सामाजिक कामात रमत असतं. त्यामुळे ते आपल्या सामाजिक कामाने अल्पावधीत परिचित झाले होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सामाजिक कामाची आवड, येथील विभागातील असणाऱ्या शाळेत जाऊन विद्यार्थांना शैक्षणिक वस्तू पुरविणे, त्यांना गरजेनुसार मदत करणे यासह विद्यार्थ्यांच्यात रमून "देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा' अशी निष्ठा ठेवून देशाप्रति असणारा आदर आणखी दृढ करण्यासारख्या सेनेतील गोष्टी सांगत. मुलांना देशाविषयी आदरयुक्त प्रेम निर्माण व्हावे, अशी इच्छा असणारे जाधव यांना शेतीचीही मोठी आवड होती. माझ्या देशातील प्रत्येक मुलाने देशसेवा करावी, अशी भावना बाळगणारे जाधव प्रत्येक कामात हिरिरीने भाग घेणारे म्हणून परिचित होते.

कुलभूषण जाधव यांना गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली पकडले होते व काल त्यांना पाकिस्तान सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. यामुळे पाकिस्तानी सरकार खोटे आरोप करून त्यांना या प्रकरणात अडकवू पाहत आहे, अशी परिसरात चर्चा होती. धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांना सोडवून आणले तसेच भारत सरकारने जोरदार ताकद लावून कुलभूषण जाधव यांच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख