पश्चिम महाराष्ट्र : आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा 

"कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नाही'' अशी राजकारणातील नेहमीची चर्चेची म्हण आहे. तसे अलिकडील काळात राजकारणात आज तुम्ही कोणत्या पक्षात आहात, असेही विचारण्याची वेळ आली आहे. राजकारणात निष्ठावंत हा शब्द परवलीचा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'किमये'मुळे भारतीय जनता पक्षात 'इनकमिंग'चा विचार केला तर ही म्हण लागू पडल्याचे दिसत होते. मतदारांनी केवळ दोन अपवाद वगळता आपली भूमिका बदलणाऱ्यांना मोठा दणका दिल्याचे चित्र पश्‍चिम महाराष्ट्रात दिसून आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र : आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा 

लोकसभा निवडणुकीचे कवित्व संपत आले असून विधानसभेच्या तयारीची सुरवात होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय परिपक्वता पणाला लावत राज्यभरातून अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात आणले. त्यांच्या या खेळीचा सकारात्मक परिणाम झाल्याचे फुटलेल्या मतपेटीने दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष बदललेल्यांमधील पश्‍चिम महाराष्ट्रातील केवळ दोघांनाच यश मिळाले आहे. निवडणुकीतील कामगिरी पाहून आघाडीतील अनेकजण आता महायुतीकडे जाण्याची चर्चा रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत कुंपणावरील या नेत्यांची परीक्षा मात्र राहील, यात शंका नाही.

गेल्या पाच वर्षात कोल्हापूरच्या धनंजय महाडीक यांनी भाजपशी जवळीकता ठेवली होती. तशीच जवळीकता कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आ. सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) या नेत्यांनी ठेवलेली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हाकेला कोण कधी होकार देतो याबाबत चर्चा सुरू झाली आहे, या कुंपणावरील नेत्यांच्या भूमिकेची परीक्षा जवळच आहे. विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी अजूनही भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख मात्र होतो. 

भूमिका बदललेल्यांना दणका
"कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नाही'' अशी राजकारणातील नेहमीची चर्चेची म्हण आहे. तसे अलिकडील काळात राजकारणात आज तुम्ही कोणत्या पक्षात आहात, असेही विचारण्याची वेळ आली आहे. राजकारणात निष्ठावंत हा शब्द परवलीचा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'किमये'मुळे भारतीय जनता पक्षात 'इनकमिंग'चा विचार केला तर ही म्हण लागू पडल्याचे दिसत होते. मतदारांनी केवळ दोन अपवाद वगळता आपली भूमिका बदलणाऱ्यांना मोठा दणका दिल्याचे चित्र पश्‍चिम महाराष्ट्रात दिसून आले आहे. कुंपणावरच्या नेत्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. भविष्यात कुंपणावरील नेत्यांची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर माढा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील माने यांचाच काय तो अपवाद ! अन्य मतदारसंघातील उमेदवारांबाबत मतदारांनी आपला रोष दाखवून दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविली होती. मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी करून लढावू वृत्तीस पाठिंबाच दिला.

परंतु या निवडणुकीत त्यांनी साखर कारखानदारीचे मनसबदार असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी सोबत केली. मतदारांनी त्यांना चक्क घरी बसा असाच संदेश दिला. येथे शिवसेनेचे धैर्यशील माने या तरुणाच्या गळ्यात विजयाची माळ घातली. माजी खासदार निवेदिता माने यांनी भूमिका बदलत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याच मागे त्यांचे पुत्र धैर्यशील यांनीही सेनेचा वाट चोखाळली. तरीही मतदारांनी त्यांना अपवादातून साथ दिल्याचे दिसते.

सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविलेल्या विशाल पाटील यांना मतदारांनी नाकारले. (कै.) वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील अनेकांना कॉंग्रेस पक्ष संघटनेत व सत्तेतील पदे भोगण्याची संधी मिळाली होती. परंतु कॉंग्रेसला ही जागा मिळत नसल्याचे पाहून विशाल पाटील यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा चोखाळलेला मार्ग त्यांना महागात पडला.

याच मतदारसंघातील भूमिका बदललेल्या वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर (पूर्वाश्रमीचे भाजप) यांना पडलेल्या मतांचा विचार केला तरीही यशाने मात्र त्यांना हुलकावणी दिली आहे. सातारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविलेल्या नरेंद्र पाटील (राष्ट्रवादीतून भाजप व तेथून शिवसेना) यांचा बोलबाला खूप झाला परंतु त्यांच्या पदरी अपयशच आले.

बहुचर्चित माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविलेल्या संजय शिंदे यांनीही वेळोवेळी भूमिका बदलली. निवडून येणारे हमखास उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. तरीही मतदार राजाने त्यांच्या पारड्यात मताचे दान टाकताना फारच विचार केल्याचे दिसले. पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या श्री. शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढविली.

जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून ते विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, सेना, कॉंग्रेस अशी सर्वांचीच साथ घेत त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी व भाजप नेत्यांशी त्यांनी जवळीकता साधली. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपकडून निवडणूक लढविण्याची दिलेली "ऑफर' नाकारत त्यांनी शरद पवारांच्या हाकेला साथ दिली अन्‌ राष्ट्रवादीकडून ते रिंगणात उतरले.

याच मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढविणारे रणजीतसिंह निंबाळकर यांनी 2004 मध्ये फलटणमध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढविली होती. नंतर ते कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष झाले. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बदललेल्या भूमिकेतून भाजपकडून बाजी मारली. ज्या फलटण विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला, त्याच मतदारसंघाने यावेळी मात्र त्यांना मताधिक्‍क्‍य दिल्याने ते अपवादच ठरले.

बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविलेल्या कांचन कुल यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादी, रासप (महायुती) नंतर भाजप असा प्रवास केला. प्रचंड चर्चेत येऊनही त्यांना फटका बसल्याचे दिसले. दूरचित्रवाणीवरील संभाजी मालिकाफेम डॉ. अमोल कोल्हे हे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु भूमिका बदलण्यापूर्वी कोणतीही निवडणूक त्यांनी लढविलेली नव्हती.

या निवडणुकीत ते मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. अढळराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला त्यांनी धूळ चारली. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय उर्फ मुन्ना महाडीक यांनी गत पाच वर्षात भाजपशी जवळीकता साधली होती. त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली तरी जवळीकतेचा फटका बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com