सांगली जिल्हा विधानसभा २०१९ : गाफील राहणे भाजपला परवडण्याजोगे नाही

सर्वच पक्षांची सावध वाटचाल, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे राज्यातील जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत हा गाफीलपणा भाजपला महागात पडू शकतो.
Anil Babar - Jayant Patil
Anil Babar - Jayant Patil

श्‍चिम महाराष्ट्रात वसंतदादा पाटलांमुळे कॉंग्रेसचा भक्‍कम राहिलेला सांगलीचा गड दहा वर्षांत ढासळू लागलाय. आता स्थिती बिकट आहे. राष्ट्रवादीनेही त्यात हातभार लावलाय. पण, त्यांनादेखील फटका बसला. अनेक मातब्बर भाजपवासी झालेत. जिल्ह्यातील विधानसभेच्या आठपैकी चार ठिकाणी भाजपचे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर कॉंग्रेसचा एक आमदार आहे.

देशात सत्ता मिळविल्यानंतर भाजपने 2014 नंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका ताब्यात घेतली. लोकसभेला दुसऱ्यांदा बाजी मारली. विधानसभेला सातत्याने चांगली कामगिरी केली. तीनचे चार आमदार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले. कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख, डाव्या विचारांचे वैभव नायकवडी असे मातब्बर भाजपसोबत येताहेत. भाजपकडून जिल्ह्यात नवे महामार्ग, रेल्वे, सिंचन या विकासकामांनी गती घेतली आहे. रोजगाराच्या पातळीवर जिल्हा मागे आहे. 

मात्र, त्याबाबत तुटून पडणारे विरोधक येथे नाहीत. कॉंग्रेसच्या ताब्यातील एकमेव महापालिकाही हातची गेली आहे. शिराळा तालुका कॉंग्रेसमुक्‍त झालाय. तुलनेत राष्ट्रवादीने इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघांवर कमांड राखली आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईक आमदार असले, तरी त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अर्थात, भाजपने येथे सत्यजित देशमुखांना आपल्याकडे घेऊन राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईकांपुढील आव्हान कडवे केले आहे.

ज्या जतमधून भाजपचा जिल्ह्यात प्रवेश झाला, तेथे आमदार विलासराव जगतापांना पक्षांतर्गतच विरोध आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा कॉंग्रेसकडे जाईल. जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. मिरज या राखीव मतदारसंघातून सुरेश खाडे या वेळी हॅट्ट्रिक साधणार का, हे महत्त्वाचे आहे. ही जागा कॉंग्रेसकडे आहे. पण, खाडेंना टक्कर देईल असा उमेदवार अद्याप मिळालेला नाही.

सांगलीतून सुधीर गाडगीळ यांनाच उमेदवारी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अंतर्गत खदखद आणि महापुराच्या मुद्द्यांचा त्यांना फटका बसू शकतो. पण, विकासाला गती देणारा स्वच्छ चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. येथे त्यांच्या विरोधात जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात रस्सीखेच आहे.

पलूस-कडेगाव, तासगावकडे लक्ष


पलूस-कडेगाव मतदारसंघात कॉंग्रेसचे विश्‍वजित कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (भाजप) या दोन युवा नेत्यांतील लढतीकडे लक्ष असेल. विश्‍वजित यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपकडून मैदानात उतरतील, तर राष्ट्रवादीकडून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई लढत देतील. खासदार संजय पाटील यांच्या पत्नीही इच्छुक असल्याने भाजपमध्ये येथे आलबेल नाही. जयंत पाटील यांचे साडू सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केलाय. ते शिराळ्यात भाजपचे उमेदवार झाल्यास जयंत पाटलांची डोकेदुखी वाढू शकेल. 

इस्लामपूरसह शिराळा, तासगावात राष्ट्रवादी भक्‍कम आहे. इस्लामपुरात नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातून विस्तव जात नाही. नायकवडी, महाडिक, खोत या गटांनी एकत्र येऊन निशिकांत यांना एकटे पाडले आहे. शिवसेनेचे अनिल बाबर खानापूर मतदारसंघातील आमदार आहेत. तेथे कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉंग्रेसकडून न लढता सर्वपक्षीय अपक्ष लढू शकतील. गोपीचंद पडळकर 'वंचित'ला रामराम करून पुन्हा भाजपमध्ये गेलेत. ते जत की खानापूरमधून लढणार, हे स्पष्ट नाही.

हे मुद्दे कळीचे
-कडकनाथ घोटाळा प्रकरण गाजणार
-महापुराचा मुद्दा सांगली, पलूस मतदारसंघात कळीचा
-एका बाजूला पूर आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळी तालुके
-रोजगार कमी झाले, नवे उद्योग नाहीत
-ऊसपट्ट्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com