विधानसभा २०१९ - नाशिक जिल्हा : महायुतीला ग्रहण नाराजीचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी सभेने नाशिकच्या भूमीरून रणशिंग फुंकत पालकमंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी 45 जागा जिंकण्याचा दावा ठोकलाय. शिवबंधनातून शिवसेनेने आपली रणभूमी घट्ट केली आहे. महायुतीची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना घेरण्याची असली, तरी महायुतीला नाराजीचे ग्रहण आहे. 'मनसे'ने नाशिकमध्ये तीन आणि इगतपुरीत उमेदवार दिले आहेत.
Chagan Bhujbal - Dada Bhuse
Chagan Bhujbal - Dada Bhuse

नकमिंगच्या लाटेने महायुतीला जिल्ह्यात फारसे काही दिलेले नाही. नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य आणि देवळाली, मालेगाव मध्य शहरी तर उर्वरित जिल्हा ग्रामीण अन्‌ आदिवासीबहुल आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादीने प्रत्येकी चार; तर कॉंग्रेसने दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक जागा मिळवली होती. या वेळी जिल्ह्याचे राजकारण वेगाने बदलले. भाजपने उमेदवार देताना 'वेटिंग'चे सत्र अवलंबल्याने नाशिकमध्ये भाजपसह शिवसेनेत नाराजी उफाळली. जिल्ह्याच्या राजकारणातल्या नाराजीच्या ठिणगीचा वणवा होणार नाही, याची दक्षता महायुती घेताना दिसत नाही. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून कॉंग्रेसची आमदारकी सोडून शिवबंधन बांधलेल्या निर्मलाताई गावितांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्याचवेळी कॉंग्रेसमधील उमेदवारीची पोकळी भरण्यासाठी राष्ट्रवादीने आपले जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकरांना कॉंग्रेसमध्ये धाडत उमेदवारी मिळवून दिली. 'मनसे'ने योगेश शेवरेंना उमेदवारी दिली. हे घडतानाच महायुतीतील माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आणि शिवराम झोले यांनी पत्ते खोलले नाहीत.

पक्षांतरातून उमेदवारी मिळवली
नाशिक शहर आणि जिल्ह्यात पक्षांतर करून अर्धा डझन जणांनी उमेदवारी मिळवली. यात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशणारे माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत स्वगृही, शिवसेनेत परतलेले माजी आमदार धनराज महाले,

               धनराज महाले

राष्ट्रवादीतून बाहेर पडत 'एमआयएम'च्या पहिल्या यादीत स्थान मिळवणारे मौलाना मुफ्ती महम्मद इस्माईल यांचा समावेश आहे. २०१४ सारखीच अॅड. कोकाटेंची सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजेंशी, महालेंची दिंडोरी-पेठचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, तर मौलानांची मालेगाव मध्यमधून कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्याशी लढत होईल. 

          राजाभाऊ वाजे

दिंडोरी-पेठचे माजी आमदार रामदास चारोस्करांनी शिवबंधन बांधले, तरीही ते नाराज आहेत. हीच अवस्था शिवसेनेच्या भास्कर गावितांची आहे. येवल्यातून छगन भुजबळांविरोधात शिवसेनेने पुन्हा संभाजी पवारांना उमेदवारी दिली. येथून शिवसेनेकडून इच्छुक माजी आमदार कल्याणराव पाटील, रूपचंद भागवतांच्या समर्थकांचे मन वळविण्याचे आव्हान आहे. नांदगावमधून राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यात लढत होईल. इथून भाजपतर्फे जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार इच्छुक आहेत. त्यांची नाराजी भोवणार की नाही, याची उत्सुकता आहे. 

      डाॅ. राहुल आहेर

चांदवड-देवळामधून विशेषतः भाजपच्या उमेदवारीसाठी प्रांतवाद उफाळला होता. भाजपने अखेर आमदार डॉ. राहुल आहेरांना पुन्हा संधी दिली. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने माजी आमदार शिरीष कोतवालांना पसंती दिल्याने लढत चुरशीची होईल. निफाडमधून शिवसेनेने आमदार अनिल कदमांवर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्याशी नेहमीप्रमाणे लढत होईल. कदमांचे चुलत बंधू यतीन यांनी सभेद्वारे शक्तिप्रदर्शनाने रणशिंग फुंकल्याने ते कुणाच्या पथ्यावर पडणार, याबद्दल उत्सुकता असेल.

       अनिल कदम

दादा भुसेंना कॉंग्रेसचे आव्हान
मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मोट बांधत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंना रिंगणात उतरवलेय.

       डाॅ. तुषार शेवाळे

बागलाणमधून राष्ट्रवादीने आमदार दीपिका चव्हाणांनाच पुन्हा रणांगणात उतरविण्याचे ठरविलेले असताना भाजपने माजी आमदार दिलीप बोरसेंना पसंती दिली. आता भाजपला अंतर्गत धुसफुस आवरावी लागेल. कळवण-सुरगाणामधून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार आणि शिवसेनेचे मोहन गांगुर्डे अशी तिरंगी लढत होईल. येथील राजकारण निकालाला कलाटणी देईल, असे दिसते.

राजकीय पटलावरील ठळक बाबी
- भाजपचे बाळासाहेब सानपांचा अपवाद वगळता सर्व आमदार रिंगणात.
- महाराष्ट्र-गुजरात पाणी प्रश्‍न प्रचारात गाजणार.
- रखडलेले कृषी प्रक्रिया उद्योग, बेरोजगारी डोके वर काढणार.
- कांद्याची निर्यातबंदी, साठवणुकीचे निर्बंध महायुतीच्या तोंडचे पाणी पळवणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com