पंकजा मुंडे राईट ट्रॅकने तरीही.....

पंकजा मुंडेंनी भाजपच्या झेंड्याखाली आंदोलन केले असले तरी भाजपच्या सर्वच वरिष्ठांना हजेरी लावावी लागल्याने पंकजा मुंडे यांना मायनस करणे भाजपलाही परवडणारे नसल्याचे यातून दिसले. आता त्यांना संपर्कात सातत्य, सरकारकडून अपेक्षेबरोबरच उणिवांवर बोट ठेवून प्रहाराची आणि त्यांचे होमपिच असलेल्या बीड जिल्ह्यात पुर्नबांधणीचीही गरज आहे
Analysis of Pankaja Munde Future Political Journey
Analysis of Pankaja Munde Future Political Journey

बीड : पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी औरंगाबादेत मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर झालेल्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बहुतेक सर्वच राज्यातील बड्या नेत्यांची हजेरी पाहता पंकजा मुंडे यांना मायनस करुन पुढे जाणे भाजपलाही अवघड आणि परवडणारे नसल्याचे स्पष्ट झाले. पंकजा मुंडे सध्या राईट ट्रॅकने जात असल्या तरीही सरकारबद्दल अपेक्षेबरोबरच आणखी उणिवांवर बोट ठेवून प्रहार करण्याबरोबरच जिल्ह्यात पक्षाच्या पुर्नबांधणीची आणि संपर्काच्या सातत्याची गरज असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकारणात लोकप्रतिनिधी अनेक असले तरी नेते नसतात. जय - पराजय देखील अनेकांना पहावा लागला. तसा, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना देखील दोनदा पराभवाचे तोंड पहावे लागले. पण, दांडगा जनसंर्क आणि त्यातही सातत्य या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गोपीनाथराव मुंडे यांना समाजाची भक्कम साथ मिळविण्यासाठीही अनेक वर्षे लागली. दरम्यान, पंकजा मुंडे यांना या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभव पत्करावा लागला. 

परंतु, दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचा वारसा आणि समाजाची साथ यामुळे त्या कुठल्या सभागृहाच्या सदस्या नसल्या तरी त्या नेत्या आहेत. किंबहुना भाजपमधील नेत्यांत त्या एकमेव मास लिडर म्हणले तरी वावगे ठरू नये. दरम्यान, पराभवानंतर गोपीनाथगडावरुन त्यांनी केलेली भाजप सुकाणू समितीतून बाहेर पडून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर फिरण्याची केलेली घोषणा, त्यानंतर भाजप आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या दोन्ही बॅनरच्या माध्यमातून सोमवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर केलेले उपोषण आणि त्याबद्दल होत असलेली चिकीत्सा आणि चर्चांचा विचार करता त्यांनी काही ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे दिसते.

विजयी होण्यासाठी आणि नेता होण्यासाठी वा नेतेपद टिकविण्यासाठी जनसंपर्कात सातत्याची गरज असते. पराभवानंतर त्या मतदार संघात आल्या ते थेट मुंडेंच्या जयंतीलाच. त्यानंतरही पुन्हा अपवादानेच त्या जिल्ह्यात आल्या. बीड जिल्हा त्यांचे राजकीय होमपिच आहे. कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी आणि नवी उमेद देण्यासाठी त्यांनी आणखी पावले उचलण्याची गरज आहे. जिल्हा परिषद ताब्यातून गेली, सभापतींच्या निवडीवेळी तर भाजपला सपशेल माघार घ्यावी लागली ही बाब फार गैरवहार्य वाटण्याजोगी नाही. 

काही महिन्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, नंतर परिषद परिषदांसह त्यांच्या वैद्यनाथ कारखान्याचीही निवडणुक होणार आहे. याची तयारी आजपासून करावी लागणार आहे. यासह पक्षाची जिल्ह्यात पुर्नबांधणीही गरजेची आहे. संघटनात्मक निवडी झाल्या असल्या तरी कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढून त्यांच्यात जोष निर्माण करणे आणि आपल्या पाठीशी कोणी खंबीर आहे ही भावना रुजविण्यासाठी जिल्ह्याला वेळ देणेही तेवढेच गरजेचे आहे. कार्यकर्त्यांच्या हातून नको त्या गोष्टी घडण्याचे कोणत्याच पक्षात नवे नाही. भाजमध्येही हे घडले. पण, त्यावेळी सत्तेच्या जत्रेत सपादून गेले. आताही पक्षाच्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेल बाधा आणणाऱ्या ‘त्या’ मंडळींना खड्यासारखे वेचून दुर करण्याची ठोस भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे.

उपोषणाबाबत चिकीत्सा होत असली तरी त्यांनी भाजपच्या बॅनरखाली आंदोलनाचा घेतलेला निर्णय सद्यस्थितीत योग्यच म्हणावा लागेल. कारण, त्यांच्या सत्तेच्या आणि मंत्रीपदाच्या काळात त्यांच्या पुढाकाराने गोपीनाथगड, भगवानभक्तीगडांवर व्यासपीठावर मोठी गर्दी होती. त्यांनी घोषित केल्यानुसार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच जर उपोषण झाले असते तर पुर्वी गर्दी करणाऱ्यांपैकी अनेकांची गोची झाली असती. एव्हाना त्यांनी पाठही दाखविली असती. तसेच पक्षाला थेट आव्हान देण्याची ही वेळही नव्हती आणि कदाचित त्यातून उघडे पडण्याचीही दुसरी भीती होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे यांच्यासह बड्या भाजप नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हजेरी लावल्याने त्यांचीही पक्षाला तेवढीच गरज असल्याचे सुचित झाले. 

आता भविष्यात राज्यातील वाटचालीत त्यांना केवळ सरकारकडून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत येवढे म्हणून भागणार नाही. त्यांचे आणि ठाकरेंचे कौटुंबिक ऋणानुबंध असले तरी राजकारण वेगळे आणि नाते वेगळे ठेवावे लागणार आहे. कारण, ठाकरे सरकारने त्यांच्या खात्याच्या २५/१५ शिर्षाची कामे, देवस्थान विकासची कामे, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनांसह इतर अनेक प्रकल्पांना स्थगिती देताना मुंडेंबरोबरच्या ऋणानुबंधाचा विचार केलेला नाही. भलेही ठाकरेंचे काम चांगले असले तरी सरकार मध्ये त्यांचे इतर दोन विरोधी पक्ष आणि नेतेही आहेत. त्यामुळे अपेक्षांबरोबरच सरकारच्या उणिवांवर बोट ठेवून त्यावर कठोर प्रहाराची भूमिकाही घ्यावी लागणार आहे.

पक्षाकडून एखादे पद मिळविण्यासाठी त्यांनी आंदोलन केले म्हणणेही वावगेच ठरेल. कारण,त्या नेत्याआणि मास लिडरही आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर केवळ मला विरोधासाठी पद दिल्याचे त्या म्हणत. आता त्यांचे पूर्वी होते तसे आणि विरोधकांकडे आहेत त्या तोडीचे पद सद्यस्थितीत तरी भाजपकडे नाही. मात्र, ज्या प्रमाणे राष्ट्रवादीने सत्ता येताच जिल्ह्यात आमदारकी आणून दाखविली तसे भविष्यात भाजपच्या वाट्याला येणारी एखादी आमदारकी जिल्ह्यात आणून आपण ‘नेत्या’च आहोत हे दाखवावे लागेल. जिल्ह्यातल्या भविष्यातील वाटचालीसाठी खंबीर भूमिका घेऊन पुनर्बांधणी करताना पद कोणाला द्यायचे आणि आपल्या हजेरीत हुजरेगिरी करणारे मागे काय दिवे लावतात याचाही त्यांना विचार करावा लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com