विधानसभा निवडणूक २०१९ : औरंगाबाद जिल्ह्यात वंचित-एमआयएमच्या दुराव्याने बदलली समीकरणे

लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अनपेक्षित विजय मिळवीत शिवसेनेला धक्का देत संसदेत प्रवेश केला. औरंगाबादेतील तीनही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला चांगलाच फटका बसला. कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली. विधानसभा निवडणुकीत एमआयएम-वंचितची आघाडी तुटल्याने आता भाजप-शिवसेना युती झाल्यास युती आणि आघाडी, एमआयएम, वंचित अशा चौरंगी लढतीची शक्‍यता आहे.
Atul Save- Bhausaheb Patil Ckhikatgaonkar
Atul Save- Bhausaheb Patil Ckhikatgaonkar

रंगाबाद मध्यमधून एमआयएमकडून 2014 मध्ये इम्तियाज जलील यांनी विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. आता ते खासदार झालेत. एमआयएमकडून नगरसेवक नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 'वंचित'कडून अमित भुईगळ उमेदवार असतील हे निश्‍चित असले, तरी अद्याप त्यांच्या नावाची घोषणा नाही. युतीत हा मतदासंघ शिवसेनेकडे असल्याने पुन्हा एकदा प्रदीप जैस्वाल इच्छुक आहेत. शिवाय, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात यांची नावेदेखील चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून कादीर मौलाना यांचे एकमेव नाव चर्चेत आहे.

पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे पुन्हा मैदानात राहतील. गेल्यावेळी 4 हजार 260 अशा निसटत्या मतांनी पराभूत झालेले "एमआयएम'चे गफ्फार कादरी हेच यावेळी सावे यांच्याविरोधात लढतील. लोकसभा निवडणुकीत एमआयएमला पूर्वमधून 92 हजार 347 मते मिळाली होती; पण "वंचित'सोबतची आघाडी तुटल्याने पूर्वमधील चित्र बदलण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसकडे असलेली पूर्वची जागा समाजवादी पक्षासाठी सोडण्यात आल्याची चर्चा आहे. याला कॉंग्रेसमधून विरोध होतोय.

      संजय शिरसाट

औरंगाबाद पश्‍चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट सलग दोन वेळा विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत येथून एमआयएमला 71 हजार मते मिळाली होती. यावेळी त्यांनी अरुण बोर्डे यांना उमेदवारी दिली आहे. आघाडीकडून कॉंग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे चर्चेत आहेत. शिवाय, शहरात बसपचे उमेदवारही रिंगणात असतील.

    डाॅ. गफ्फार कादरी

"ग्रामीण'मध्ये चुरसच
गंगापूरमधून गेल्या वेळी प्रशांत बंब विजयी झाले होते. युतीत ही जागा शिवसेनेकडे असली, तरी आमदार म्हणून त्यांचेच नाव चर्चेत आहे. शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला असून, देवयानी डोणगावकर, संतोष माने यांची नावे घेतली जात आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार कैलास पाटील-चिकटगावकर, ज्ञानेश्‍वर नीळ यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडे असलेल्या वैजापूरमधून प्रा. रमेश बोरणारे आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर यांचे नाव चर्चेत आहे.

कन्नडमधून माजी आमदार हर्षधर्वन जाधव या वेळी आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत, केतन काजे, अण्णासाहेब शिंदे यांची नावे घेतली जाताहेत. आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असला, तरी राष्ट्रवादीने येथे दावा केलेला आहे.

जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, सिल्लोड-सोयगाव हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतात. सिल्लोड-सोयगावमधून कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात सुरेश बनकर, सांडू पाटील-लोखंडे, ज्ञानेश्‍वर मोठे यांनी सत्तार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. कॉंग्रेसकडून प्रभाकर पालोदकर यांचे नाव चर्चेत आहे.

फुलंब्रीत भाजपकडून हरिभाऊ बागडे पुन्हा इच्छुक आहेत; पण वयाच्या निकषात त्यांना उमेदवारी नाकारली जाते की काय? अशी चर्चा आहे. त्यामुळे अनुराधा चव्हाण, प्रदीप पाटील, विजय औताडे या इच्छुकांनीदेखील जोर लावलाय. कॉंग्रेसकडून डॉ. कल्याण काळे हेच उमेदवार असतील. पैठणमध्ये शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांचे एकमेव नाव घेतले जाते. आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात माजी आमदार संजय वाघचौरे, अनिल जाधव, अप्पासाहेब निर्मल यांनी उमेदवारी मागितलेली आहे.

निवडणुकीत गाजणारे प्रश्‍न

- औरंगाबादेतील तीन मतदारसंघात रस्ते, पाणी, कचऱ्याची समस्या गंभीर.
- एकुणातच जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडलेलाच.
- ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था.
- पीककर्ज, पीकविम्याबाबत शेतकऱ्यांची मोठी नाराजी.
- औरंगाबादसह ग्रामीण भागात रोजगाराची वानवा.
- ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com