कोकणात शिवसेनेने गड राखला पण...

कोकणात गड राखण्यात शिवसेनेला यश आले असले तरी घटलेले मताधिक्‍य पाहता पुढील काळात कोकणवासीयांना केवळ गृहित धरून चालणार नसल्याचा धडा मिळाला आहे. युती असली तरी शिवसेना-भाजपमध्ये झालेले पाडापाडीचे राजकारणही त्याला कारण ठरले आहे. यातच कणकवलीतील विजयाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय अस्तित्व राखण्यात यश मिळवले आहे; मात्र तिकडे रायगडमध्ये शेकापचे बालेकिल्ले ढासळले आहेत.
Narayan Rane - Deepak Kesarkar
Narayan Rane - Deepak Kesarkar

त्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पैकी सात जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. चिपळूणमधील जागा तर त्यांना गमवावी लागली. रायगडात अनेक वर्ष प्रभाव असलेल्या शेकापला जोरदार झटका बसला. तेथेही  शिवसेना-भाजपमधील पाडापाडीचे राजकारण प्रकर्षाने दिसले. तर काही जागांवर युती एकवटल्याने शिवसेनेच्या पारड्यात विजयश्री पडल्याचेही चित्र आहे. सिंधुदुर्गात गेल्यावेळी तीन पैकी दोन जागा शिवसेनेकडे तर एक कॉंग्रेसकडे होती; पण ऐनवेळी नारायण राणेंना भाजपचा दरवाजा खुला झाल्याने खरी लढाई युतीतील या दोन पक्षातच झाली. 

कणकवलीत भाजपच्या नितेश राणेंविरोधात शिवसेनेने राणेंच्याच गोटातून फुटलेल्या सतिश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली. येथे राणे समर्थक आणि भाजप यांचे मनोमिलन झाल्याने शिवसेनेच्या प्रखर विरोधावर मात करत नितेश राणे मोठ्या फरकाने विजयी झाले.

कुडाळमध्ये नारायण राणेंचा 2014 मध्ये पराभव करणाऱ्या वैभव नाईक यांच्या विरोधात राणेंचे समर्थक रणजित देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपने त्यांना मदत केली. सावंतवाडीत शिवसेनेतर्फे पालकमंत्री दीपक केसरकर यांना भाजपचे राजन तेली यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले होते. केसरकर यांनी येथे विजय मिळविला.

रत्नागिरीतील पाचपैकी चार जागांवर त्यांनी विजय मिळवला असला तरी चिपळूणचा गड त्यांना गमवावा लागला. गेल्यावेळच्या तुलनेत येथे शिवसेनेची एक जागा वाढली. राजापुरमध्ये तिसऱ्यांदा हॅटट्रीक साधताना शिवसेनेच्या राजन साळवी यांना अवघे 12 हजार मताधिक्‍य मिळाले.

रत्नागिरीत शिवसेना, भाजप आणि उदय सामंत यांची वैयक्‍तीक ताकद एकत्र आल्याने त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. चिपळूणमध्ये शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना असलेला मतदार संघातील विरोध भोवला. राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी येथून मोठा विजय मिळवला. दापोलीत रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम विजयी झाले. यावेळी कुणबी फॅक्‍टर शिवसेनेसोबत राहिला. गुहागरमध्ये भास्कर जाधव शिवसेनेत आल्याने विजय सोपा झाला.

रायगडातील शेकापचे दोन्ही बालेकिल्ले शिवसेनेकडे गेले. यावेळी युतीला तब्बल पाच जागा मिळाल्या. भाजपच्या ताकदीवर एक अपक्षही निवडून आला. सुनिल तटकरेंच्या कन्या आदिती यांनी श्रीवर्धनची जागा राखली.

उरणमध्ये भाजपचे बंडखोर महेश बालदी यांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांना पराभव दाखवला. पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर यांच्या प्रभावाच्या जोरावर भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी दुसऱ्यांदा 91 हजार 617 इतक्‍या मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवला. कर्जतमध्ये शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाल्याचा फायदा घेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे विजयी झाले. पेणमध्ये कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री रविंद्र पाटील यांनी भाजपकडून जिंकले. हा बालेकिल्ला 23 हजारांच्या मताधिक्‍याने भाजपकडे आला. अलिबागची शेकापची जागा शिवसेनेने 32 हजार 981 इतक्‍या मताधिक्‍याने खेचून घेतली. महेंद्र दळवी यांनी येथे शेकापच्या संदीप पंडीत यांचा पराभव केला. श्रीवर्धनमध्ये सुनिल तटकरे यांनी कन्या आदिती यांना विजय मिळवून दिला. महाडमध्ये शिवसेनेच्या भरत भोगावले यांनी कॉंग्रेसच्या माणिक जगताप यांचा 21 हजारांच्या फरकाने पराभव केला.

पक्षीय बलाबल - 2014
* सिंधुदुर्ग - शिवसेना - 2, कॉंग्रेस - 1,
* रत्नागिरी - शिवसेना - 3, राष्ट्रवादी - 2
* रायगड - शिवसेना - 2, भाजप - 1, राष्ट्रवादी -2, शेकाप - 2

पक्षीय बलाबल - 2019
* सिंधुदुर्ग - शिवसेना - 2, भाजप - 1,
* रत्नागिरी - शिवसेना - 4, राष्ट्रवादी - 1
* रायगड - शिवसेना - 3, भाजप - 2, राष्ट्रवादी -1, अपक्ष - 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com