विधानसभा २०१९ -अकोला जिल्हा : वंचित आणि आघाडीसह शिवसेनेलाही कष्ट घ्यावे लागणार

जिल्ह्यात गत दोन निवडणुकांपासून कॉंग्रेस, राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे. त्यांच्यासह आता दोन आमदारांवरून एकवर आलेल्या भारिप-बहुजन महासंघासाठीही यंदाची निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. विधानसभेची जिल्ह्यातील एकच जागा शिवसेनेला मिळाली आहे. या बाबी पाहता कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेलाही अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडणार आहे.
Randir Sawarkar - Harish Pimple
Randir Sawarkar - Harish Pimple

जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2014 च्या निवडणुकीत अकोट, अकोला पूर्व व पश्‍चिम आणि मूर्तिजापूर हे चार मतदारसंघ भाजपने पटकावले होते. बाळापूरची जागा 'भारिप-बमसं'ने राखली होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली. वंचित बहुजन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. 

यातही बाळापूरमध्ये भाजप आणि मित्र पक्षातील अनागोंदीचा फायदा 'भारिप-बमसं'चे बळीराम सिरस्कार यांना झाला, ते दुसऱ्यांदा आमदार झाले. या वेळी त्यांनाच पक्षाने घरचा रस्ता दाखवलाय. पाच वर्षांत जिल्ह्यात खूप घडामोडी घडल्यात. भाजपने पाचही मतदारसंघांत केलेल्या बांधणीने विरोधकांना चांगलेच जेरीस आणले आहे. कॉंग्रेससह 'भारिप-बमसं'पुढेही सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान होते.

      गोवर्धन शर्मा               प्रकाश भारसाकळे     बळीराम सिरस्कार

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन्हीही कॉंग्रेसतर्फे उमेदवार निवडीवरून चुरस होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जिल्हा प्रतिष्ठेचा बनला आहे. केंद्रात मंत्रिपद मिळविल्यानंतर रामदास आठवले यांच्या 'आरपीआय'ला जिल्ह्यात रिलॉंचिंग करण्याचा प्रयत्न युतीकडून होताना दिसतोय. हे आव्हान नसले तर धोक्‍याची चाहूल निश्‍चितच आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि 'भारिप-बमसं'साठी अकोला होमपिच आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष अॅड. आंबेडकरांच्या जिल्ह्यातील कामगिरीवर राहणार आहे.

अल्पसंख्यांकांवर डोळा
जिल्ह्यातील पाचपैकी दोन मतदारसंघांत अल्पसंख्यांकांची मते निर्णायक आहेत. अकोला पश्‍चिम आणि बाळापूर मतदारसंघातील या मतांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा डोळा राहणार आहे. तर 'एमआयएम'कडून दोन्ही मतदारसंघांत उमेदवार देण्यात आल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीही कॉंग्रेस आघाडीला प्रयत्न करावे लागतील. २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेस स्वतंत्र लढल्यानंतर अकोला पश्‍चिममध्ये कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला अधिक मते मिळाली होती. दुसरीकडे बाळापूरमध्येही मुस्लिम मतांसह मराठा समाजाची मते गृहीत धरून राष्ट्रवादीने केलेला दावा कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मान्य केलाय. अकोला पश्‍चिममध्ये मुस्लिम उमेदवार दिला असल्याने कॉंग्रेस आघाडीला अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते मिळणार असली तरी बाळापूरमध्ये मतांचे विभाजन टाळताना कसोटी लागणार आहे.

सर्वत्र बंडखोरीचा पेच
अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोला पश्‍चिम या मतदारसंघांत राजकीय गुंतागुंत आहे. सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी असली तरी एकालाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे इतर प्रबळ दावेदार नाराज झालेत. त्यांनी ती अपक्ष अर्ज दाखल करून व्यक्त केली आहे. सर्वांनाच बंडखोरीने ग्रासल्याने पुढील १५ दिवस उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com