माजी पंचायत समिती सदस्या अमृता गुरव भाजपमध्ये

माजी पंचायत समिती सदस्या अमृता गुरव भाजपमध्ये

कडूस : शिवसेनाप्रणित युवासेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष व खेड पंचायत समितीतील शिवसेनेच्या माजी सदस्या अॅड. अमृता गुरव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत रविवारी भाजपात प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश हा खेड तालुका शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.

गुरव या 2012 ते 17 या पंचवार्षिक निवडणुकीत कडूस-वाडा जिल्हा परिषद गटातील वाडा पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या एकमेव व सर्वात तरुण पंचायत समिती सदस्या म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यानंतर युवासेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या शिवसेनेकडून कडूस-वाडा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या, परंतु त्यांना तिकीट न दिल्याने त्या नाराज होत्या. तेव्हापासून त्या शिवसेनेपासून अलिप्त होत्या. अखेर त्यांनी रविवारी (ता.15) शिवसेनेपासून फारकत घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुण्यात सर्किट हाऊस येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, डॉ. ताराचंद कराळे, दिगंबर देशमुख, मिलिंद बोत्रे, दत्तात्रेय वाघमारे उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत त्या चर्चेत आहेत. 'मी कोणावरही नाराज नाही. प्रतिक्रिया देणार नाही, पण कृतीतून आपण आपल्याला सिध्द करून दाखवू,' असे मत त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत व्यक्त केले. गुरव या शिवसेनेचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आढळराव यांना शिवसेनेने उपनेतेपद बहाल केले, त्यातच दोनच दिवसांपूर्वी त्यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा वेळी व ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आढळराव यांच्या खंदया समर्थक गुरव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मित्र पक्ष भाजपत प्रवेश केल्याने त्यांचा हा पक्ष प्रवेश शिरूर लोकसभेचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह तालुका शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com