विधानपरिषदेसाठी धुळे - नंदुरबारमधून भाजपकडून अमरिशभाई की अन्य कुणी ?

विधानपरिषदेसाठी धुळे - नंदुरबारमधून भाजपकडून अमरिशभाई की अन्य कुणी ?

नंदुरबार : विधान परिषदेची धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन वर्षासाठी असलेल्या आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षामध्ये चुरस निर्माण झाली आहे. शिरपूरचे माजी आमदार अमरिशभाई पटेल, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आणि धुळ्याचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यापैकी कुणाचे पारडे तिकीटासाठी जड ठरते हे येत्या आठ दिवसात दिसणार आहे. 

धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी येत्या तीस मार्चला मतदान होत आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडून आलेले शिरपूरचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमध्ये अमरिशभाईंनी तसा उशीराच प्रवेश केला होता. पण त्यांच्या प्रवेशामागे अनेक गणित होती. 

भाजपलाही जिल्हा भाजपमय करण्यासाठी त्यांच्यासारख्या बड्या हस्तींची गरज होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजप अधिकच मजबूत झाला. राज्यात जवळपास भाजप- शिवसेना युतीचीच सत्ता येईल असे चित्र दिसत होते. तसा जनादेशही आला पण सत्तेच्या समीकरणात शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेचा हातातोंडाशी आलेला भाजपचा घास गेला आणि सारीच गणित चुकली. आता सत्ता नसताना होणारी ही निवडणूक म्हणूनच भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

भाजपमध्ये येताना कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले अमरिशभाई पटेल हे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असणार आहेत, मात्र धुळे जिल्ह्यातूनच विधानसभेची उमेदवारी न मिळालेले जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हेही इच्छूकांच्या स्पर्धेत आहेत. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातून भाजपचे जिल्हाध्यक्ष व ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर भाजपची पकड मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान असलेले विजय चौधरी हेही प्रबळ दावेदार आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून ते पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com