अमरीश पटेलच ठऱले `किंग मेकर`

....
amrishbhai patel become king maker in dhule zp
amrishbhai patel become king maker in dhule zp

शिरपूर : निवडणुकीसह पक्ष कोणताही असो, ज्येष्ठ नेते अमरिशभाई पटेल किंगमेकर होते आणि राहणार हे आज पुन्हा स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा, लॉबिंग, मोर्चेबांधणी, ठोकताळ्यांना पूर्णविराम देत धुळे जिल्हा परिषदेच्या विखरण गटातील सदस्य तुषार रंधे "मिनी मंत्रालया'चे कारभारी म्हणून निवडले गेले.

कलाबाई भिल, सरला पाटील यांच्यानंतर शिरपूर तालुक्‍याला तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे या तिघांना अध्यक्षपदाची संधी देण्यात नेते पटेल यांनीच किंगमेकरची भूमिका बजावली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षण सोडतीनंतर सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले. तेव्हापासून प्रत्येक पक्षाने हे पद लक्षात घेऊनच मोर्चेबांधणी केली. यंदा प्रथमच मोठा राजकीय वारसा आणि दिग्गजांचा वरदहस्त असलेले मातब्बर उमेदवार बहुसंख्येने निवडून गेले. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळवले. त्यामुळे कोणाला संधी मिळेल याबाबत अखेरपर्यंत उत्सुकता होती.

शिरपूर तालुक्‍यात सर्व 14 गटांवर वर्चस्व राखताना साक्री तालुक्‍यातही आपले समर्थक निवडून आणण्यात अमरिशभाई यशस्वी ठरले. पाठबळाचा आकडा मोठा झाल्यानंतरही अध्यक्षपदाचा लोलक धुळे, शिंदखेडा असा लांबता असल्याचे चित्र होते. मात्र, तालुक्‍याने दिलेल्या प्रतिसादाची परतफेड करण्याच्या निर्णयावर ठाम राहत अमरिशभाईंनी शिरपूरसाठी आग्रह धरला. परिणामी श्री. रंधे आज सत्तारूढ झाले.

रंधे यांची वाटचाल, चुणूक
श्री. रंधे यांनी बोराडी ग्रामपंचायतीपासून राजकीय जीवनाची सुरवात केली. बाजार समितीचे संचालकपद त्यांनी भूषवले. पाठोपाठ बोराडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून गेले. 2013 मध्ये बोराडी गट महिलेसाठी राखीव झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सीमा रंधे निवडून गेल्या. बोराडीचा बालेकिल्ला भक्कम ठेवताना त्यांना बंधू तथा भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, नगरसेवक रोहित रंधे, शशांक रंधे यांचे कायम पाठबळ लाभले. विशेष म्हणजे कर्मवीर व्यंकटराव रंधे यांनी 1962 ते 1967 या कालावधीत तत्कालीन धुळे व नंदुरबार जिल्हा लोकल स्कूल बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले होते. सद्यःस्थितीत "किविप्र' संस्था, खासगी शिक्षण संस्था संघटना, जिल्हा बॉक्‍सिंग असोसिएशन, कर्मवीर पतसंस्था अशा बहुविध संस्थांवर तुषार रंधे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. खिलाडू वृत्तीसाठी ओळखले जाणारे तुषार रंधे टेबल टेनिस, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, सायकलिंग व ट्रेकिंग अशा खेळांचे कसलेले खेळाडू आहेत.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते वडील (कै.) विश्वासराव रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश क्रीडा महोत्सवापासून तुषार रंधे यांनी संस्थात्मक कार्याचा श्रीगणेशा केला. बीएस्सीपर्यंत (कृषी) शिक्षण झालेल्या तुषार रंधे यांचा मित्रपरिवार मोठा आहे. विखरण गटातून प्रतिस्पर्ध्यापेक्षा तब्बल सात हजार 443 मते अधिक मिळवून लोकप्रियतेची चुणूक दाखवली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात विकासाचा मोठा ओघ असेल, अशी अपेक्षा व्यक्त होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com