Amravati Political war between Anandrao Adsul & Navneet Rana takes ugly turn | Sarkarnama

अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध खासदार अडसूळ असा संघर्ष भडकला ;खंडणीचा गुन्हा केला दाखल  

सरकारनामा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह चारजणांविरुद्ध गुरुवारी अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

अमरावती  : खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह चारजणांविरुद्ध गुरुवारी अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वीच गाडगेनगर ठाण्यात खासदारांच्या तक्रारीवरून आमदार रवि राणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे आमदार रवी राणा व खासदार आनंद अडसूळ यांच्यातील संघर्ष आता अधिकच वाढण्याचे संकेत आहेत. 

खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह जयंत वंजारी, सुनील भालेराव, कार्तिक शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. खासदारांच्या सांगण्यावरून सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी बदनामी केली, शिवाय त्यांच्या संपर्कातील व्यक्ती जयंत वंजारी यांनी दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आमदार रवी राणा यांना एक कोटीची खंडणी मागितली, असा आरोप नवनीत राणा यांनी राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला. हा सर्व प्रकार खासदार अडसूळ यांनी सांगितल्यानुसार केल्या गेला, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार यांनी शासकीय यंत्रणेचा वापर करून आपली मानहानी केल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. 16 डिसेंबर 2013 ते 31 जुलै 2018 या कालावधीत घडलेला हा घटनाक्रम असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

दरम्यान, याप्रकरणी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, 2013 ते 2018 यादरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध जाऊन जातपडताळणी समितीकडे संबंधित आमदाराला अनेक प्रयत्न  करावे लागले. विदेश मंत्रालयाने दिलेल्या पत्रानुसार फिर्यादीचे वडील 2007 पासून तब्बल 11 वर्षे विदेशात होते, असे असताना त्यांच्या खोट्या सह्या करून गुन्हा करण्यात आल्याचा चौकशी आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिला आहे. हा आदेश होताच खोट्या खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. 2014 मध्येसुद्धा गाडगेनगर पोलिस ठाण्यात असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी तो रद्द झाला. तोच गुन्हा रिओपन करण्याची नोटीस मला व्हॉट्‌सऍपवर पाठवून हा केविलवाणा प्रकार असल्याचे खासदार अडसूळ 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख