Amravati election | Sarkarnama

अमरावती "जिप'मध्ये सेना कॉंग्रेससोबत 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

कॉंग्रेस व शिवसेना अधिकाधिक जवळ येत असून अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. 

नागपूर : कॉंग्रेस व शिवसेना अधिकाधिक जवळ येत असून अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. 

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, वर्धा व यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. यांपैकी चंद्रपूर व वर्धा जिल्हा परिषदेत भाजपला पूर्ण बहुमत आहे. अमरावती जिपमध्ये कॉंग्रेस बहुमतात आहे. गडचिरोली, बुलडाणा व यवतमाळ जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने आघाडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसला बहुमत असतानाही शिवसेनेला सोबत घेऊन बहुमत भक्कम केले आहे. या आघाडीमध्ये सेनेच्या वाट्याला उपाध्यक्षपद जाणार आहे. 

यवतमाळमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपने कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा डाव टाकला आहे. त्यामुळे कॉंग्रेस-भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी आघाडी यवतमाळमध्ये आकाराला येऊ शकते. यात कॉंग्रेसला अध्यक्षपद भाजपला उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन सभापतीपदाची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. 

गडचिरोली जि.प.मधील संभाव्य आघाडीची स्थिती स्पष्ट झालेली नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी राज्यमंत्री अंम्ब्रिश राजे आत्राम यांचे कॉंग्रेसचे बंडखोर दीपक आत्राम यांचे पटत नसल्याने आत्राम यांनी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेस-दीपक आत्राम गट व अपक्ष अशी सत्ता आकार घेऊ शकते. तसेच भाजप-राष्ट्रवादी व अपक्ष असेही समीकरण जुळू शकते. त्यामुळे यवतमाळ, गडचिरोली व बुलडाणा जिपमधील राजकीय आघाडीचे चित्र धूसर आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख