अमरावती भाजपमध्ये आता महापौरपदावरुन अंतर्गत कलह

..
BJP symbol
BJP symbol

अमरावती ;  विधानसभा निवडणुकीत महापालिका क्षेत्रातील दोन्ही मतदारसंघांत सपाटून मार खाल्लेल्या भाजपमध्ये आता महापौरपदावरून कलह निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे.

कालपर्यंत आमदार गटाच्या असलेल्या वर्चस्वाला यावेळी जोरदार आव्हान दिल्या जाण्याची शक्‍यता आहे. माजी पालकमंत्री व मूळ भाजपचा गट सक्रिय झाल्याची माहिती आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महापौरपदासाठी निवडणुक होण्याची शक्‍यता आहे.

9 सप्टेंबरला महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आला. मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौर, उपमहापौर तसेच जि. प. अध्यक्षांसह विषय समिती सभापती पदांच्या निवडीवर तीन महिने स्थगिती देण्यात आली. ही मुदत या आठवड्यात संपत असून आरक्षणाची सोडत आहे.

यावेळी सोडत खुल्या वर्गासाठी निघेल, अशी अपेक्षा आहे. गतवेळी हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. तर, गेल्या पंचवार्षिकमध्ये पहिले अडीच वर्षे अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिल्यानंतर खुल्या वर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. यावेळी तसेच अपेक्षित असल्याने महापौरपदाकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.

यावेळी खुल्या गटासाठी सोडत निघाल्यास भाजपकडून तुषार भारतीय यांचे नाव अग्रक्रमावर आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा असताना व तयारी झाली असताना हुलकावणी मिळाली. त्यामुळे महापौरपदासाठी सध्यातरी त्यांचे नाव वर आहे.

महापालिकेतील या सर्वोच्च पदावर आरूढ होण्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनेकजण आतुर आहेत. गतवेळी ज्यांना चाट बसली त्यांनी यावेळीही घोडे दामटले आहे. तर, खुल्या वर्गासाठीच सोडत निघणार आहे, असे गृहीत धरून काहींनी बाशिंग बांधले आहे.

विद्यमान पंचवार्षिकमध्ये महापौरपदासह प्रमुख पदांवर माजी आमदार गटाचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता दुसऱ्या गटातील सदस्यांमध्ये शक्ती संचारली असून त्यांनी बंडाचा झेंडा फडकावण्याची तयारी केली आहे. पण सोडतीवरच इच्छुकांचे भविष्य अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com