अमरावती : कथित `ऑडिओ क्लिप'मुळे विधानसभा निवडणुकीत ठिणगी पडणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच भाजप व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या संभाषणाच्या कथित क्‍लिपने सध्या जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकसभेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र असून विधानसभेत त्याची ठिगणी पडण्याचे संकेत आहेत.
अमरावती : कथित `ऑडिओ क्लिप'मुळे विधानसभा निवडणुकीत ठिणगी पडणार?

अमरावती : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच भाजप व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या संभाषणाच्या कथित क्‍लिपने सध्या जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकसभेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र असून विधानसभेत त्याची ठिगणी पडण्याचे संकेत आहेत. 

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यात झालेले संभाषण विधानसभा निवडणुकीत आपले पाय रोवण्याची तयारी मानले जाते. अर्थातच सूर्यवंशी यांनी तिवस्यात त्यांची फिल्डिंग लावली आहे. तेथे भाजपच्या निवेदिता चौधरी तयारीत आहेत. त्यामुळे भाजपमधील दोन इच्छुकांतील वाद समोर येण्याचे संकेत आहेत. तर आपल्याच पक्षाच्या शेखावतांच्या कथित संभाषणाने आमदार यशोमती ठाकूर भडकल्या आहेत.
 
रावसाहेब शेखावत हे अमरावती विधानसभा मतदारसंघातून परत एकदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारात सर्वत्र वावर होता. दुसरीकडे आमदार डॉ. सुनील देशमुखही युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे अमरावतीत परत एकदा रावसाहेब विरुद्ध सुनील देशमुख असा सामना रंगण्याचे संकेत आहेत. 

बडनेरात युवा स्वाभिमानचे रवी राणा गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांचा बडनेरा मतदारसंघातील संपर्क लक्षवेधी होता. या मतदारसंघात भाजपातर्फे तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, शिवसेनेचे सुनील खराटे शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आजवर युतीत हा मतदारसंघ शिवसेनेसाठी तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत तो राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. 

लोकसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे मेळघाट. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी नवनीत राणा यांना साथ देण्याची घोषणा करून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. तर दर्यापूर मतदारसंघात माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ परत एकदा रिंगणात येतील काय याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते पूर्णवेळ प्रचारात होते. लोकसभा निवडणुकीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच त्यांची ही रणनीती होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी या मतदारसंघात चांगलाच जोर लावला. 

लोकसभा निकालावर भिस्त 
लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावर अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाची वाटचाल निश्‍चित होणार आहे. आनंदराव अडसूळ विजयी झाले तर जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्या हातातच राहणार आहे, अन्‌ नवनीत राणा यांनी बाजी मारली तर राष्ट्रवादीत त्यांचे स्थान महत्वाचे मानले जाईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्यांनी सध्यातरी "वेट ऍण्ड वॉच' ची भूमिका घेतली आहे. 

- बडनेरा मतदारसंघात राष्ट्रवादीचा कोण, ही बाब गुलदस्त्यात. 
- मेळघाटात राजकुमार पटेलांची उमेदवारी चर्चेचा विषय. 
- कथित ऑडिओ क्‍लिपने रावसाहेब शेखावत व दिनेश सूर्यवंशी अडचणीत. 
- लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी लावलेला जोर पक्षावरची पकड मजबूत करणारा. 
- दिनेश बूब शिवसेनेत परतल्याने त्यांना दर्यापुरात संधी.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com