कृषिमंत्र्यांसह दिग्गजांची फौज असलेल्या अमरावतीत महायुतीला हादरा

तब्बल चार आमदार, तीन विधानपरिषद सदस्य, राज्याचे कृषिमंत्री व दिग्गजांची फौज असलेल्या सत्ताधारी भाजप-सेना महायुतीला अमरावती जिल्ह्यात जोरदार धक्का बसला. भाजपने त्यांच्याकडे असलेले चारही मतदारसंघ गमावले आहेत.
कृषिमंत्र्यांसह दिग्गजांची फौज असलेल्या अमरावतीत महायुतीला हादरा

अमरावती - तब्बल चार आमदार, तीन विधानपरिषद सदस्य, राज्याचे कृषिमंत्री व दिग्गजांची फौज असलेल्या सत्ताधारी भाजप-सेना महायुतीला अमरावती जिल्ह्यात जोरदार धक्का बसला. भाजपने त्यांच्याकडे असलेले चारही मतदारसंघ गमावले आहेत. 

शिवसेना तसेच राष्ट्रवादीला जिल्ह्यात खातेसुद्धा उघडता आले नाही, तर दुसरीकडे तब्बल चार अपक्षांनी जिल्ह्यात बाजी मारली. यातील दोन अपक्ष महाआघाडी समर्थित आहेत. कॉंग्रेसचे मात्र जिल्ह्यात अच्छे दिन आल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल अतिशय धक्कादायक लागले. अमरावती, मोर्शी, दर्यापूर व मेळघाट हे चारही मतदारसंघ भाजपने गमावले असून केवळ धामणगावरेल्वे येथे प्रताप अडसड यांनी भाजपची प्रतिष्ठा राखली. दुसरीकडे कॉंग्रेसची जिल्ह्यात शक्ती वाढली आहे. अमरावतीत सुलभा खोडके यांनी डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव करून खाते उघडले. दुसरीकडे दर्यापुरात बळवंत वानखडे यांनी बाजी मारली तर तिवसा मतदारसंघात ऍड. यशोमती ठाकूर यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्ट्रिक साधली.

देशपातळीवर क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपला एकीकडे अमरावतीत त्यांचे चारही मतदारसंघ गमवावे लागले तर दुसरीकडे अपक्षांनी जिल्ह्यात बाजी मारली. आमदार बच्चू कडू यांनी अचलपूरची आपली जागा कायम राखत चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी परत एकदा बाजी मारून या मतदारसंघात हॅट्ट्रिक साधली, तर मेळघाट मतदारसंघात माजी आमदार राजकुमार पटेल यांनी बलाढ्य उमेदवारांना धूळ चाखत दिमाखदार विजय साजरा केला. विशेष म्हणजे राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या विरुद्ध रिंगणात असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी डॉ. बोंडे यांना हरवून इतिहास घडविला. श्री. भुयार हे महाआघाडीचे घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमाने निवडणुकीच्या रिंगणात होते.

चार बाद, एक धाव!
भाजपने चार मतदारसंघ गमावले, मात्र धामणगावरेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड यांनी अतिशय अटीतटीच्या स्थितीतसुद्धा बाजी मारून भाजपची प्रतिष्ठा राखली. याठिकाणी त्यांनी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते प्रा. वीरेंद्र जगताप यांचा त्यांनी पराभव केला.

फायदा तोटा कुणाचा?
भाजपचे चार आमदार जिल्ह्यात असताना त्यांची संख्या एकवर आली आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे दोन आमदार असताना त्यांचे तीन झाले. अपक्षांची संख्या दोन होती ती आता चारवर गेली आहे. यातील दोन अपक्ष उमेदवार हे महाआघाडीचे घटकपक्ष असल्याने एकप्रकारे आघाडीला जिल्ह्यात तब्बल पाच जागा मिळाल्याचे मानले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com