सरकारनामा ब्यूरो
"शिवसेनेचं ठाणे...ठाण्याची शिवसेना" हे सूत्र पक्कं करण्यासाठी अगदी तळागळापर्यंत पोहचवण्याचं काम करणारा नेता म्हणून आनंद दिघे यांना ओळखलं जातं.
शिवसेनेची शाखा, संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये दिघे यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांचं पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असं होतं.
आनंद दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरामध्यं त्यांचं घर होतं. याच परिसरात असणाऱ्या सेंट्रल मैदान भागांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या.
बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेसाठी काम करण्याचं ठरवलं. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत ते पोहचले आणि अल्पावधीतच ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले.
आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा.
आपल्या तक्रारी घेऊन लोक सकाळपासून रांगा लावून उभे असायचे. समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती.
आनंद दिघे यांनी लोकांना संघटीत करण्यासाठी अनेक उत्सवांचं आयोजन केलं. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली.
आनंद दिघे यांची सामान्यांमध्ये ‘आपला नेता’ अशी ओळख होती. त्यांच्या याच कामांमुळे त्यांच्या मृत्यूला दोन दशक होऊन सुद्धा ठाणेकर आनंद दिघेंना विसरलेले नाही. या कारणामुळेच 'आनंद दिघे' यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे.
2022 मध्ये 'धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे', हा चित्रपट निघाला आहे.