नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने बांधली लगीनगाठ ; कोण आहे असर मलिक

सरकारनामा ब्युरो

मलाला युसुफझाईने टि्वट करीत या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

बर्मिंगहॅममधील तिच्या घरी त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मलाला क्रिकेटची चाहती असून योगायोगाने तिच्या पतिचं देखील पाकिस्तान क्रिकेटशी महत्वपूर्ण कनेक्शन आहे.

मलाला युसुफझाईने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अनमोल दिवस आहे. आयुष्यभराचे साथी बनण्यासाठी मी आणि असर लग्न बंधनात अडकलो आहे.

मलालाने या ट्विटमध्ये लग्नाचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने अगदी साध्या टी पिंक रंगाचा पोशाखासह अगदी मोजके दागिने परिधान केले आहेत. तर तिचा पती असरही काळ्या रंगाच्या अगदी साध्या सूटामध्ये दिसत आहे.

मलालाचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांनीही मलालाच्या लग्नाची माहिती ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, हे शब्दांपलीकडचे आहे. मलालाच्या या ट्विटला सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळतोय. या ट्विटला आता ७० हजारांहून अधिक लाईक्स आणि ६ हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

तालिबानच्या हल्ल्याला पराभूत करून महिलांचा आवाज जगासमोर बुलंद करणारी महिला म्हणून ती उदयास आली. २०१४ मध्ये मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. मलाला वयाच्या १७ व्या वर्षी सर्वात तरुण नोबेल विजेती आहे.