Happy Birthday मुलायम सिंग यादव

सरकारनामा ब्युरो

सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यादव यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात स्वत: मोठी ओळख निर्माण केली. ते आज आपला ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मुलायम सिंह यादव यांनी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 या तीन अल्प कालावधीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ते वडील आहेत. ते सध्या आझमगड मतदारसंघाचे खासदार आहेत.

मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशात सामाजिक सलोखा राखण्यात मोठे योगदान दिले. एक धर्मनिरपेक्ष नेता अशी मुलायमसिंह यांची ओळख आहे. त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो. उत्तर प्रदेशच्या राजकीय जगतात मुलायमसिंह यादव यांना प्रेमाने नेताजी म्हटले जाते.

1996 मध्ये मुलायम सिंह यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. पण हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि भारताला तीन वर्षांत दोन पंतप्रधान दिल्यानंतर ते सत्तेतून बाहेर पडले.

मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधान करण्याचीही चर्चा होती. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते आघाडीवर होते, पण त्यांच्या जातीतील लोकांनीच त्यांना साथ दिली नाही.लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांनी त्यांच्या या इच्छेवर पाणी फेरले.

2012 मध्ये मुलायम सिंह यादव यांचा पक्ष पुन्हा सत्तेत आला, पण यावेळी त्यांनी आपला मुलगा अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवून सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंत केले.