अमोल कोल्हेंना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीसाठी नवसंजीवनी

अमोल कोल्हेंना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीसाठी नवसंजीवनी

निफाड : राज्यातील सत्ताधारी पक्षाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदारांना आपल्या पक्षात घतेले. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने डॉ. अमोल कोल्हे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरु केली. तिला निफाडला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने पक्षासाठी ती लाभदायी ठरली आहे. 

शिवस्वराज्य यात्रेमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. यात्रेचे नेतृत्व डॉ. कोल्हे यांच्याकडे असल्याने सध्यातरी यात्रेकडे तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे आकर्षण असलेले शिरूर मतदारसंघाचे खासदार व "स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे 6 ऑगस्टपासून राज्यभर दौरा करीत आहेत. येत्या काही दिवसांतच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने राजकीय वारे जोरदार वाहू लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली. शिवसेनेने युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनाशीर्वाद यात्रा सुरू केली.

या यात्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ही शिवस्वराज्य यात्रा असल्याचे म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील यात्रेमध्ये खासदार उदयनराजे भोसले गैरहजर असले तरी त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या सरकारवर तुटून पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टीने डॉ. अमोल कोल्हे पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून देतील, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात डॉ. कोल्हे यांच्याविषयी तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. याचाच फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेऊ इच्छित आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत त्याचा परिणाम दिसेल, असे तूर्त तरी दिसत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com