अमित शहांनी अखेर `त्या गोष्टींची` परतफेड चिदंबरम यांना केलीच

अमित शहांनी अखेर `त्या गोष्टींची` परतफेड चिदंबरम यांना केलीच

पुणे : एखाद्या चित्रपटातही इतकं प्रभावी सूडनाट्य पाहायला मिळत नाही. कधी काळी व्हिलन ठरलेला दहा वर्षांनी हिरो झालाय आणि कालचा हिरो आज जामीन मिळविण्यासाठी उंबरठे झिजवतोय. 

अमित शहांच्या घरी 2010 मध्ये सीबीआयचा छापा पडला. गुजरातचे गृह राज्यमंत्री असलेल्या शहांना आपण तुरुंगात जाऊ, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण त्यांना काय माहिती की तेव्हा पी. चिदंबरम नावाचा तीक्ष्ण बुद्धिचा, काॅंग्रेस संस्कृती कोळून पिलेला आणि आपल्यासमोरील खरा शत्रू ओळखणारा गृहमंत्री इतक्या वेगवान चाली रचेल म्हणून.

मोदी आणि शहा ही जोडी आपल्याला भविष्यात जड जाणार आहे, हे काॅंग्रेसवाल्यांना उमगले होते. त्यामुळेच मग सर्व तपास यंत्रणा त्यातही सीबीआयमार्फत या दोघांविरोधात जाळे विणले होते. मोदी यांची तर तब्बल नऊ तास सीबीआयने चौकशी केली होती. देशाच्या इतिहासात प्रथमच एखादा मुख्यमंत्री पोलिसांच्या चौकशीला इतका वेळ सामोरा गेला होता. 

सोहराबुद्दीन याची चकमक गुजरातच्या एटीएसने केली होती. ही चकमक बनावट असल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर अमित शहांना कोर्टात चकरा माराव्या लागल्या. जुलै 2010 मध्ये अमित शहांना सीबीआयने अटक केली. आॅक्टोबर पर्यंत ते तुरुंगात होते. गुजरात उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही त्यांना आपल्या घरी जाता आले नाही. कारण त्यांना गुजरात बंदिचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सीबीआयचा `पोपट` चिदंबरम हवा तसा वापरत होते, असा भाजपने तेव्हा आरोप केला होता.

हाच पोपट कधीतरी आपल्या पिंजऱ्यात येईल, हे अमित शहांनाही स्वप्नात वाटत नसावे. पण 2014 नंतरचे सर्व फासे त्यांच्या मनाप्रमाणे पडले आणि चिदंबरम यांच्यावरचा फास आवळत गेला. शीना बोरा खूनप्रकरणी इंद्राणी मुखर्जी अटकेत आली आणि तिने चिदंबरम यांचे बिंग फोडले. एका मिडिया कंपनीशी संदर्भात चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती आणि पत्नी हे तिघेही आरोपी आहे. अमित शहा 2010 मध्ये जामिनासाठी उंबरठे झिजवत होते. आता चिदंबरम यांच्यावर ती वेळ आली आहे. चार महिने शहांनी तुरुंगात काढले. आता चिदंबरम किती दिवस राहतात, याचा हिशोब शहा करत असतील.

चिदंबरम यांच्या अटकेमागे सूडनाट्य नाही, असे भाजपवाले कितीही म्हणत असतील तरी आपल्याला जेलमध्ये पाठविणाऱ्याला त्याच ठिकाणी पाठविण्याचे खुमखुमी कोणत्या राजकारण्याला नसेल?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com