जाहिरातबाजीशिवाय केजरीवालांनी काही काम केले नाही : अमित शहा

जाहिरातबाजीशिवाय केजरीवालांनी काही काम केले नाही : अमित शहा

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याआधीच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षावर यांच्यावर जोरदार हल्ला चढवून ही निवडणूक आपण स्वतःच्या हातात घेतल्याचे संकेत दिले. लाजपतनगर भागात 'दिल्ली साइकल वॉक' परियोजनेचे उद्घघाटन करताना शहा यांनी, केजरीवाल सरकारने पाच वर्षे कामे न करता अखेरच्या पाच महिन्यांत स्वतःच्याच जाहिराती झळकावल्या व निवडणूक येताच आप व कॉंग्रेसने नागरिकत्व दुरूस्ती कायदा-सीसीए वरून युवकांना भडकावून दंगल पेटविली असा आरोप शहा यांनी केला. 

भाजप नेत्यांची अंतर्गत गटबाजी शहा यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी दिल्लीची निवडणूक स्वतःच्या हातात घेतल्याचे स्पष्ट चित्र आहे. आजच्या कार्यक्रमातही त्यांनी सायकल या विषयावर "या ट्रॅकवरून 50 लाख दिल्लीकर जाऊ लागतील तेव्हा सायकल चालविणे ही दिल्लीची नवी फॅशन बनेल' यासारखी मोजकी वाक्‍ये बोलल्यावर लगेच सरळ कॉंग्रेस व केजरीवालांवर हल्ला सुरू करून, सायकल वॉकचे रूपांतर एका प्रकारे इलेक्‍शन वॉकमध्ये करून टाकले. त्याचबरोबर भाजप दिल्लीच्या लढाईत भाजप ध्रुवीकरणाच्याच ट्रॅकवरून जाणार याचेही संकेत त्यांनी दिले. 

कॉंग्रेस, राहूल व प्रियांका गांधी यांनी सीसएवरून अल्पसंख्यांकांची दिशाभूल केली व दिल्लीतील दंगलींच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. आपनेही यात वादग्रस्त भूमिका बजावली. दिल्लीची जनता याचा हिशोब नक्की मागेल असे शहा कडाडले. शहा यांनी सांगितले की की केजरीवाल सरकारने पाच वर्षे काहीच काम केले नाही व अखेरच्या पाच महिन्यांत जाहिरातींचा मारा करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले. आधी केजरीवाल म्हणत की कोणतीही सरकारी सुविधा मी घेणार नाही. नंतर मात्र बंगला व गाडी घेऊन टाकली. दिल्लीत सारीकडे वाय-फाय सुविधा देण्याची घोषणा त्यांनी केली पण वाय-फाय चे कनेक्‍शन शोधता शोधता तरूणांच्या मोबाईलमधील बॅटरी संपते तरी वाय फाय मिळतच नाही. केजरीवालांनी 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या जाहिराती केल्या पण दिल्लीकर शोधून शोधून दमले तरी हे कॅमेरे नक्की कोठे बसविलेत हे समजत नाही. लोकसभा निवडणुकीत आपचा सफाया करून दिल्लीच्या जनतेने आपला मूड दाखवून दिला आहे. येथील जनता नरेंद्र मोदींबरोबर ठामपणे जोडलेली आहे. 

आपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील 80 टक्के घोषणा कागदावरच राहिल्या. 20 महाविद्यालये व 500 शाळा हे उघडणार होते पण आता त्यासाठीही जाहिरातीच पहाव्या लागतील असे दिसते. केवळ राजकीय स्पर्धेमुळे तुम्ही मोदींच्या आयुष्मान भारत योजनेची दिल्लीत अंमलबजावणी केली नाही. केजरीवाल सरकारने गाव व गरीब यांचे सर्वाधिक नुकसान केले याचाही हिशोब जनता मागणार आहे. 

दिल्लीत आपच्या आव्हानासमोर यंदा भाजपच्या काही जागा वाढतील असे चित्र आहे. मात्र अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या भाजपची ही अग्निपरीक्षाच आहे. भाजप नेत्यांनी, मंत्र्यांनी व खासदारांनी भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची पोस्टरबाजी सुरू केल्याचे दिसत आहे. भाजप मुख्यालयापासून काही पावलांवर दिल्लीच्या सातही खासदारांना दिल्लीचे मुख्यमंत्री करून टाकणारे पोस्टर झळकत आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी "तिकीट वाटपाची सूत्रे अमित शहा यांच्याकडेच राहतील' असे इच्छुकांना अगोदरच सांगण्यास सुरवात केल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com