दसरा मेळाव्यात अमित शहांच्या स्वागताला 370 तोफांची सलामी आणि 370 तिरंगी झेंडे ...

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे. मंगळवारी मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असेल.
 दसरा मेळाव्यात अमित शहांच्या स्वागताला 370 तोफांची सलामी आणि 370 तिरंगी झेंडे ...

बीड : 370 कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या 370 तोफांची सलामी आणि 370 तिरंगी झेंडे लावून स्वागत करणार आहेत. पंकजा मुंडेंच्या पुढाकाराने होणाऱ्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याला श्री. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 
पूर्वी भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन होई. भाषणातून ते समाजाला दिशा देत असत. मात्र, त्यांच्या पश्‍चात गडावर राजकीय भाषण नाही, अशी भूमिका गडाच्या महंतांनी घेतली. त्यानंतर श्रीमती मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी संत भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे मेळावा घेतला. मागच्या वर्षी या ठिकाणी बाबांची भव्य मुर्ती उभारुन भगवान भक्तीगड असे नामकरण केले. 

मंगळवारी होणाऱ्या या तिसऱ्या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि भाजप नेत्यांची उपस्थिती असेल. गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलम रद्द केल्यामुळे 370 तोफांची सलामी आणि 370 तिरंग्या झेंड्यांनी स्वागत केले जाणार आहे. सभास्थळी मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे लावण्यात येणार आहेत. दरम्यान, श्री. शहा यांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी बारा एकर मोकळ्या जागेवर दोन व्यासपीठ उभारण्यात आले असून एका व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांच्यासह प्रमुख तर दुसऱ्या व्यासपीठावर आमदार, उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांनी रविवारी (आयबी, सीआयडी, सीआरएफ) या तीन्ही सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळी भेट देऊन मेळाव्याच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. 

मेळाव्यासाठी वाहन तळाची आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. येथे तीन स्वतंत्र हेलीपॅड उभारले आहेत. पोलिस अधिक्षकांसह चार अप्पर पोलिस अधिक्षक, दहा उपाधिक्षक, सोळा निरीक्षक, महिला कर्मचारी, होमगार्ड यांच्यासह जवळपास दोन हजार पोलिस अधिकारी येथे बंदोबस्तासाठी तैनात असतील. मेळाव्यासाठी येणाऱ्या गहिनीनाथ गड मार्गे कुसळंब रस्ता, मुगाव व पाटोद्याकडून येणाऱ्या प्रमुख तीन्ही रस्त्यावर दीड किलोमीटर अंतरावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना आठ ठिकाणाहून प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भगव्या पताका आणि तिरंगा झेंड्यांनी परिसर सजविण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com