भाजपला नवा अध्यक्ष फेब्रुवारीनंतरच, दिल्लीची निवडणूक महत्वाची...

  भाजपला नवा अध्यक्ष फेब्रुवारीनंतरच, दिल्लीची निवडणूक महत्वाची...

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्यांची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे. अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल अशा हालचाली आहेत. 

दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकित करणारा एखादा तरूण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिध्द धक्कातंत्र वापरू शकतात अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल "दिल्लीकर' असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात. 

भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार 50 टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. यावेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरूण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावा. 

एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील "प्रवेशा' बाबत शहा "साहीब' फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. मात्र नड्डा अध्यक्ष बनले तरी पक्षाला संघटनात्मक निवडणुकांचे "आन्हीक' पार पाडावे लागणारच आहे. ती प्रक्रिया मकर संक्रांतीनंतर सुरू करण्यात येईल. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक चालू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते. 

दिल्ली निवडणुकीच्या प्रभारीपदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून पक्षाचे राज्य प्रभारी शाम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी तर अन्य बहुतांश नेते पंजाबी बॅकग्राऊंडचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे. पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या सभेत सीसीए बाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही याविरोधातील आंदोलने थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मोदी राष्ट्रीय रंगमंचावर आल्यावर कुठलाही वाद झाला तरी त्यांच्या शब्दांच्या मारानंतर प्रकरण थंड होत गेल्याचा पूर्वानुभव असलेल्या भाजपला ताजी आंदोलने व "हम देखेंगे' हा जाज्वल्य निर्धार अनपेक्षित व धक्कादायक ठरत आहे. त्यामुळे दिल्लीत स्वतः शहांनीच लक्ष घालण्याचे ठरविले आहे. दिल्लीतील बूथप्रमुखांशी संवादापासून उमेदवार निवडीपर्यंत शहा स्वतःच दिल्लीची जबाबदारी सांभाळतील. त्यामुळे ही निवडणूक पार पडेपर्यंत पक्षाध्यक्षपदी तेच रहाणे ही सत्तारूढ पक्षाची अपरिहार्यता बनली आहे. 

सीएएबाबत महत्वाच्या नेत्याकडे जबाबदारी 
वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबतच्या घरोघर जनसंपर्क मोहिमेसाठी पक्षाने नितीन गडकरी, राजनाथसिंह, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस आदी 42 नेत्यांना देशभरातील राज्ये व शहरे वाटून दिली आहेत. पंतप्रधानांच्या दोनदा आवाहनानंतरही या कायद्याबाबतची नाराजी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने घरोघरी जनसंपर्काला पक्षाने बळ देण्याचे ठरविले आहे. यात जावडेकरांच्या जोडीला शहा स्वतः दिल्लीतच तळ ठोकून रहातील. नड्डा (गाझीयाबाद), नितीन गडकरी (नागपूर), राजनाथसिंह (लखनौ), निर्मला सीतारामन (जयपूर), रविशंकर प्रसाद ( फरीदाबाद), स्मृती इराणी (गुडगाव), पियूष गोयल (मुंबई), भूपेंद्र यादव (लक्षद्वीप) मुख्तार अब्बास नक्वी (रामपूर), नितायानंद राय (रांची), अर्जुन राम मेघवाल (उदयपूर), फडणवीस (मुंबई वगळता अख्खा महाराष्ट्र) आदी नेत्यांना घरोघरी जाऊन सीसीएबाबत लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com