नागरिकत्व विधेयकावर शहा ठरले विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य

....
नागरिकत्व विधेयकावर शहा ठरले विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य

नवी दिल्ली : नागरिकत्व कायदादुरूस्ती विधेयक ऐतिहासिक असून शेजारच्या तीन देशांतील हिंदूंसह इतर अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी आहे. भारतातील मुसलमान पूर्ण सुरक्षित असून त्यांना घाबरण्याचे तिळमात्रही कारण नाही असा युक्तिवाद अमित शहा यांनी राज्यसभेत केला. पाकिस्तान वाईटच आहे तर देशात इतके मजबूत सरकार व मजबूत नेतृत्व असताना या पाकिस्तानलाच नष्ट का करत नाही असा खोचक सवाल शिवसेनेने विचारला. 

कॉंग्रेससह विरोधकांनी विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याचा जोरदार आग्रह धरला. सावरकर प्रणित द्विराष्ट्र सिध्दांताला नवा व घातक रंग देण्याचा हा प्रकार असल्याचे विरोधकांनी नमूद केले. हे विधेयक कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही व न्यायालय ही वादग्रस्त कायदादुरूस्ती रद्द करेल असे भाकीत पी चिदंबरम यांच्यासह बहुतांश पक्षनेत्यांनी केले. 

हा भारताच्या आत्म्यावरचा हा हल्ला आहे असे टीकास्त्र कांग्रेसचे आनंद शर्मा यांनी सोडले. भिंती व बंद खिडक्‍या असलेले घर मला नको तर माझी संस्कृती अबाधित राखतानाच जगातील उत्तमोत्तम गोष्टींना स्थान देणारे घर मला हवे असे सांगणाऱया महात्मा गांधींच्या चष्म्यातून देशाकडे पहा, असा सल्ला देताना शर्मांनी गांधीजींचा चष्मा फक्त जाहिरातीसाठी वापरू नका असा टोला लगावला. कपिल सिब्बल यांनी, भारतीय प्रजासत्ताकाला दोन डायनोसॉरच्या राज्यात बदलू नका असा टोला पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीत पण शहांकडे पहात लगावला. 

शहा म्हणाले की पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या तीन देशांत नरक यातना भोगणाऱया हिंदू व ख्रिश्‍चनांसह अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हे विधेयक आहे. हे कोट्यावधी अन्यायाग्रस्तांसाठी उद्याची सकाळ नव्या आशा घेऊन येईल. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यावर वेगवेगळे संभ्रम व अफवा पसरविल्या जात आहेत. हे काही भारतातील मुस्लिमांविरूध्द नाही. जे मुसलमान भारताचे नागरिक आहेत ते राहतीलच. त्यांच्यावर अन्याय होणारच नाही. पण जगभरातील मुसलमान येथे येतील व आम्ही त्यांना भारताचे नागरिक करू, हे कसे शक्‍य आहे. अशाने देश कसा चालेल. 

शहा म्हणाले की लोकशाहीत पक्षांचे निवडणूक जाहीरनामे महत्वाचे असतात. भाजपने 2019 च्या जाहीरनमाम्यातच या कायद्याचे आश्वासन दिले होते व आम्हाला मिळालेला जनादेश त्यालाच होकार देणारा आहे.आम्ही मतपेढीचे राजकरण करत नाही. नरकाचे जगणे जगणाऱया तिन्ही देशातील लाखो- कोटी अल्पसंख्यांकांना न्याय देणारे व ऐतिहासिक आहे. शर्मा म्हणाले की 2016 मध्येही हेच विधेयक तुम्ही आणले होते. त्यात व यात प्रचंड फरक आहे. मुस्लिमांना वगळणे ही या प्रस्तावित कायद्याची खरी समस्या आहे. आमचा विरोध राजकीय नसून घटनात्मक व नैतिक आहे. यामुळे देशभरात असुरक्षिततेची भिती आहे. तुम्ही साऱया देशात शरणार्थींच्या छावण्या बनविणार काय. आमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे व सरदार पटेल मोदी यांना भेटले तर ते यामुळे फार नाराज होतील. 

चिदंबरम यांची प्रश्नावली 
चिदंबरम यांनी, याला न्यायालयात आव्हान मिळणे निश्‍चित असल्याचे सांगतानाच, निवडून आलेल्या लोकांनी केलेले कायदे घटनात्मक की घटनाबाह्य हे निवडून न येणारे न्यायाधीश व वकील ठरवणार हे अनैसर्गिक व आमच्या तोंडावर मारलेली चपराक नाही का, असे विचारले. त्यांनी पुढील प्रश्न विचारले 
- कायदा विभाग, ऍटर्नी जनरल यांचे मत संसदेसमोर का आणत नाही. 
- अल्पसंख्यांकांवर अन्यायाच्या नावाखाली तीनच देश का निवडले 
- इतर शेजारी देशांचे व अहमदीयांसारख्या धमीर्यांचे काय. 
- श्रीलंकेतील हिंदू व भूतानमधील ख्रिश्‍चनांवर होणारे अन्याय सरकारला दिसत नाहीत का पहायचे नाहीत 
- घटनेतील कलम 14 चे मुलभूत उल्लंघन नाही का. 

आम्ही हिदुत्वाच्या शाळेचे मुख्याध्यापक - संजय राऊत 
शिवसेनेचे संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच फटकारे लगावले. शिवसेनेला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र कोणी देण्याची गरज नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्याचे आम्ही हेडमास्तर आहोत. बाळासाहेब ठाकरे, अटलजी, श्‍यामाप्रसाद मुखर्जी हे सारेच त्याचे मुख्याध्यापक आहेत असा टोला राऊतांनी शहांकड़े पहात लगावला. ते म्हणाले की देशाच्या जनतेने सर्वांनाच मते दिली आहेत. देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी. ही भारताची संसद आहे पाकिस्तानची नव्हे असेही त्यांनी सुनावले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com