शिवसेनेला जमिनीवर आणणारा खुलासा 13 ऑक्टोबरलाच झाला होता!

हरियाणा आणि महाराष्ट्रात दोन तृतियांश बहुमत मिळेल असा दावा अमित शहा यांनी याच कार्यक्रमात केला होता. महत्वाची बाब म्हणजे ज्या मुख्यमंत्रीपदावरून भाजप- सेना युती तुटण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दलची स्पष्ट भुमिका शहा यांनी मांडलेली आहे. त्यांनी सेनेसोबत मुख्यमंत्रीपदाचे वाटप होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. हा कार्यक्रम 13 ऑक्टोंबरला प्रसारित झाला आहे. मतदानापुर्वीच आठवडाभर आधीच शहा यांनी हा खुलासा करत शिवसेनेला वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली होती.
शिवसेनेला जमिनीवर आणणारा खुलासा 13 ऑक्टोबरलाच झाला होता!

पुणे: ज्या मुद्यावरून शिवसेना- भाजपने एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप केले त्या मुद्दावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानापुर्वी आठवडाभर आधीच सुस्पष्ट खुलासा केल्याची बाब आता समोर आली आहे. 

राज्य विधानसभेसाठी 21 ऑक्टोंबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली. त्यानंतर सातत्याने भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा विषय चर्चेत आहे. निवडणूक निकालात महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे, मात्र शिवसेनेने आधी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत.

ऐन दिवाळीत देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भाने केलेल्या दाव्याने शिवसेना- भाजपत संघर्ष पेटला. भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द शिवसेनेला दिलेला नाही, असे फडणवीस यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेची चर्चा बंद केली. फडणवीस स्वत: खोटं बोलून मला खोटं ठरवू पहात आहेत, असा तीव्र आक्षेप ठाकरे यांनी नोंदवला. त्यानंतर आठ- दहा दिवस युतीत काहीएक सकारात्मक घडले नाही. वर्षा बंगल्यावरून केलेले फोनही उद्धव ठाकरे यांनी घेतले नाहीत. दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे रोज सकाळी भाजपवर हल्लाबोल करीत होते. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात नव्हते. यादरम्यान, सेना- भाजपचे खरंच काय ठरले होते, याचे नेमके उत्तर मिळत नव्हते. 

ज्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर भाजपने पहिल्यांदा शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही, असे ठामपणे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनेने तशी मागणी केली होती, मात्र त्यावर भाजपने निर्णय दिला नव्हता, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले . त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दाव्याला उत्तर दिले. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा 'मातोश्री'वर अमित शहा यांच्यासमोर झाली होती. त्याला शहा यांनी होकार दिला होता, मात्र हा निर्णय जाहीर न करण्याची विनंती फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांनी मात्र फिरवला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतरही भाजपने आपली भुमिका कायम ठेवली. 

सेना- भाजप एकमेंकावर खोटारडेपणाचा आरोप करत असतानाच राज्यात नवी राजकीय आघाडी उभी राहत आहे. भाजप दिलेला शब्द पाळत नसल्यानेच शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करत असल्याचे चित्र उभे केले गेले आहे. यापार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांच्या दाव्यातील हवा काढणारी क्लिप आता व्हायरल झाली आहे. ही क्लिप 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी न्यूज चॅनेलच्या 'फ्रँकली स्पिकिंग' या कार्यक्रमाची आहे. या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा सहभागी आहेत. या कार्यक्रमात त्यांना आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहोत आणि तेच मुख्यमंत्री होतील, असे शहा यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का, या प्रश्नावर शहा यांनी मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचा विषय नाही, कारण ते पद एकच आहे. जागावाटप आम्ही केलेले आहे, त्यानुसार लढत असल्याचे उत्तर दिले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com