अमित शहा यांचा पुत्रच नोटाबंदीचा लाभार्थी : राहुल गांधी यांचा हल्लाबोल

अमित शहा यांचा पुत्रच नोटाबंदीचा लाभार्थी : राहुल गांधी यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची उद्योगातील कोटी-कोटींची उड्डाणे पाहून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरवात केली आहे. जय यांच्या कंपनीला मागील अडीच वर्षांमध्ये झालेल्या नफ्यावरून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. 

""नोटाबंदीचा लाभार्थी अखेर सापडला आहे. तो काही आरबीआय, देशातील गरीब अथवा शेतकरी नसून ते शहा-ईन-शहा आहेत, जय अमित'' असे उपरोधिक ट्‌विट करत राहुल गांधी यांनी संबंधित बातमीची एक लिंकदेखील आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे. या बातमीमध्ये कंपनीचा आर्थिक ताळेबंद आणि वार्षिक अहवालाचा समावेश असून, मार्च 2013 आणि 2014 या वर्षाच्या अखेरीस शहा यांच्या "टेम्पल एंटरप्रायजेस लिमिटेड' या कंपनीने कोणतीही लक्षवेधी कामगिरी केल्याचे दिसून येत नाही. 

या दोन्ही वर्षांत कंपनीचा तोटा अनुक्रमे 6 हजार 230 आणि 1 हजार 724 एवढा होता. याच कंपनीने 2014-15 मध्ये केवळ 50 हजार रुपयांच्या महसुलावर 18 हजार 728 रुपयांचा नफा कमावला होता, 2015-16 मध्ये या कंपनीची उलाढाल 80 कोटी रुपयांवर पोचली, ही वाढ शहापुत्राच्या कंपनीस एका वित्तीय संस्थेने देऊ केलेल्या 15.78 कोटी रुपयांच्या असुरक्षित कर्जामुळे झाली आहे. कर्ज देणारी वित्तीय संस्था सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या त्याच्याच एका नातेवाइकाची आहे. 

कॉंग्रेस नेत्यांची टीका 
राहुल यांच्या ट्‌विटनंतर कॉंग्रेस नेते राजीव गौडा, गौरव गोगोई आणि रणदीप सुरजेवाला यांनीही भाजववर ट्‌विटहल्ला चढविला. शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही याच मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालय याबाबत शहा आणि त्यांच्या पुत्राकडून स्पष्टीकरण मागविणार का, असा सवाल सुरजेवाला यांनी ट्‌विटवरून केला आहे. 

दावा दाखल करणार : पीयुष गोयल 
राहुल गांधी यांनी भाजप अध्यक्षांच्या पूत्राचाच भांडाफोड करीत बॉम्ब टाकल्याने भाजप नेते चांगलेच संतप्त झाले असून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत बोलतान राहुल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

आम्ही लवकरच कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेणार असून अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमित शहा यांच्या पूत्राच्या कंपनींचा कारभार पारदर्शक असून त्यांच्या कंपनीला जो फायदा झाला आहे त्याचे मार्जिन कमी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com