amit gorakhe works without GR | Sarkarnama

अमित गोरखे यांचा `फंडा'; साठे महामंडळावर अधिकृत नियुक्तीपूर्वीच काम सुरु

उत्तम कुटे
शुक्रवार, 7 जून 2019

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे या पिंपरी-चिंचवडमधील उच्चशिक्षित तरुणाची निवड तीन महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात झाली. मात्र, त्यांच्या नियुक्तीचा जीआर हा काल (ता.6) निघाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरचा महामंडळ नियुक्तीचा हा पहिलाच शासकीय आदेश आहे. 

पिंपरीः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे या पिंपरी-चिंचवडमधील उच्चशिक्षित तरुणाची निवड तीन महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात झाली. मात्र, त्यांच्या नियुक्तीचा जीआर हा काल (ता.6) निघाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरचा महामंडळ नियुक्तीचा हा पहिलाच शासकीय आदेश आहे. 

दरम्यान, कालचा हा नियुक्तीचा अधिकृत शासकीय आदेश येण्यापूर्वीच गोरखे यांनी सत्कार घेतले. कामही सुरु केले. राज्यभर दौरा केला. बैठकाही घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे हे आक्रीत घडले. मात्र, गोरखे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहेत.त्यामुळे त्यांनी जीआर वा अधिकृत नियुक्तीपत्राची वाट न पाहता लगेच काम सुरु केले. राज्यभर दौरा केला. बैठकांचा जोर लावला. महामंडळाला लागलेला डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु केला. 

आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे या तीनशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी 385 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. त्या आरोपाखाली ते सध्या तुरुंगात आहेत.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आजच (ता.7) निवड झालेले महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शिफारसीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरखे यांची नेमणूक केलेली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी गोरखेंची शिफारस केली होती. त्यावर 5 मार्चला त्यांची निवड झाली. मात्र,त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुक जाहीर झाली.या निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्चला लागली. परिणामी या नियुक्तीची अधिकृत घोषणा आणि जीआर रखडला. तो आचारसंहिता संपल्यानंतर काल जारी करण्यात आला. 

दरम्यान, यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले दुसरे पद मिळाले. 2014 ला राज्यात युतीची सत्ता येताच अॅड. सचिन पटवर्धन यांची राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले हे पहिले पद उद्योगनगरीला मिळाले. त्यापूर्वी मंत्री वा राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे कुठलेही पद शहराला मिळालेले नव्हते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोरखे यांच्या रुपाने तसे दुसरे पद देण्यात आले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख